चंद्रपूर : बरांज गावातील प्रकल्‍पग्रस्‍तांचा रोजगारासाठी जलसमाधीचा प्रयत्‍न | पुढारी

चंद्रपूर : बरांज गावातील प्रकल्‍पग्रस्‍तांचा रोजगारासाठी जलसमाधीचा प्रयत्‍न

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा भद्रावती तालुक्यातील बरांज येथील कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत कार्यरत कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांना रोजगार देण्यापासून कंपनी व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्‍यचा आरोप मृतकांच्या वारसदारांनी केला. या कारणास्‍तव (शनिवारी) मृतकांच्या वारसदारांनी खाणीतील मोठमोठ्या खोल खड्यात जल समाधी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. दिवसभर पोलिस ठाण्यात ठेवून त्‍यांना सायंकाळी सोडून दिले. मात्र (रविवार) सायंकाळपासून प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा खाणीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

भद्रावती तालुक्यातील बरांज गावापासून शंभर मिटरवर कर्नाटका एम्टा (कर्नाटका पॉवर कॉरपोरेशन लि.) खुली कोळसा खाण आहे. ही खाण कर्नाटका सरकारच्या अखत्यारीत आहे. सन 2008 मध्ये ही खाण सुरू करण्यात आली होती. त्यानंतर देशातील कोळसा घोटाळ्यात या खाणीचा समावेश असल्याने हि खाणी सन 2015 ते 2020 या कालाधीत बंद होती. त्यानंतर 2020 मध्ये खाण पुन्हा सुरू करण्यात आली. त्या बरांज गावात ही खाण सुरू करण्यात आली, त्या गावाचे पुनर्वसन अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा मागील अनेक वर्षांपासून कंपनीविरोधात लढा सुरूचं आहे.

परंतु, खाण व्यवस्थापन प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष करीत आहे. या खाणींमध्ये कार्यरत कामगार बरांज या गावातील घेण्यात आलेले आहेत. परंतू कामगार विविध समस्यांनी बेजार आहेत. त्यामुळे कामगारांचे कंपनी विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसत असतात. जे कामगार कार्यरत होते. त्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. मात्र मृतकांच्या कुटूंबातील युवकांना कामावर घेण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा लढा जिल्हा प्रशासन आणि खाण व्यवस्थापन यांच्या विरोधात सुरू आहे.

चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खाणीत काम करताना मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंबियांच्या 11 कामगारांना तत्काळ कामावर घेण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांची अवहेलना कंपनी व्यवस्थापन करीत आहे. त्यामुळे 11 कुटूंबियांच्या सदस्यांना कामावर घेण्याबाबत कंपनीला साकडे घातले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने (शनिवारी) सकाळी प्रकल्पग्रस्तांच्या कुटूंबियांनी खाणीत येऊन पाणी भरलेल्या खाणीतील खोल खड्यात जल समाधीचा प्रयत्न केला. परंतु पोलिस प्रशासनला वेळीच माहिती मिळाल्याने त्यांनी महिलांन व पुरूषांना जल समाधीपासून रोखले.

त्यानंतर त्‍यांना पोलिस ठाण्यात नेऊन दिवभर ठेवले. सायंकाळी प्रकल्पग्रस्तांना सोडून दिल्यानंतर सायंकाळी पुन्हा खाणीत येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. चोवीस तासापासून 15 कुटूंबिय प्रकल्पग्रस्त खाणीतच ठिय्या मांडून असल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला बरांज ग्रामवासीयांनी व ग्राम पंचायतीने पाठिंबा दिला आहे.

प्रकल्पग्रस्त अंधारात कर्नाटका उजेडात

भद्रावती तालुक्यातील बरांज येथील कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतून दररोज लाखो टन कोळसा काढला जातो. हा कोळसा कर्नाटकामधील बैलारी येथे पाठविल्या जातो. मात्र त्या कामगरांच्या भरवशावर हे काम सुरू आहे. त्याच्या जिवनात सध्या अंधार आहे, मात्र कर्नाटका उजेडात आहे. मृतक कामगारांच्या कुटूंबियांना कामावर घेण्यापासून कर्नाटका एम्टा दुर्लक्ष करीत असलल्याने आंदोलन सुरू झाले आहे. जे कामगार सध्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तेही विविध समस्यांनी बेजार झाले आहेत.

Back to top button