चंद्रपूर येथे ११ मार्चला राज्यस्तरीय महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन | पुढारी

चंद्रपूर येथे ११ मार्चला राज्यस्तरीय महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरातील वन अकादमी येथे ३५ वे पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन ११ आणि १२ मार्चरोजी करण्यात आले आहे. संमेलनाच्या लोगोचे अनावरण आज (दि.२६) इको-प्रो पर्यावरण संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी संमेलनाच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.

यंदा इको-प्रो संस्थेतर्फे ११ आणि १२ मार्च २०२३ रोजी चंद्रपूर शहरात ३५ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन वन प्रबोधिनीच्या प्रशस्त परिसरात करण्यात येणार आहे. राज्यातील तीनशेपेक्षा अधिक पक्षीमित्र, अभ्यासक, विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय संमेलनात पक्षी अभ्यासकांचे मार्गदर्शन, नवोदितांचे सादरीकरण होणार आहेत. निवास व्यवस्था, छायाचित्र प्रदर्शन, छायाचित्र स्पर्धा, स्मरणिका प्रकाशन, शालेय विद्यार्थ्याना सहभागी करून घेण्यासाठी स्पर्धा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती इको-प्रो संस्थेचे पर्यावरण विभाग प्रमुख नितिन रामटेके, इको-प्रो पक्षी संरक्षण विभागाचे बंडू दुधे यांनी यावेळी दिली.

यावेळी लोगोचे अनावरण करण्यात आले. चंद्रपूर या गोंडकालीन ऐतिहासिक शहरात आयोजित होत असल्याने शहराची ओळख म्हणून लोगोमधे किल्ला-परकोटाची भिंत घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील माळढोक पक्षी व त्याच्या अधिवास संवर्धनाची गरज आणि जिल्ह्यातून संपुष्टात आलेला ‘सारस’ पक्षी, अधिवासबाबत चिंतन करण्याच्या दृष्टीने, हा लोगो (बोधचिन्ह) लक्षवेधक ठरणार आहे.

संमेलनादरम्यान पर्यारण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांची व्याख्याने परिसंवाद व सादरीकरणे होतील. ‘माळढोक’ पक्ष्यांची जिल्हा व राज्यातील परिस्थिती, “सारस’ पक्षी संवर्धनापुढील आव्हाने, चंद्रपूर जिल्ह्यात ‘सारस’ पक्षाचे पुनरागमन, संकटग्रस्त ‘सारस व माळढोक’ या पक्षी संवर्धनासाठी देश पातळीवरील प्रयत्न व भविष्यातील वाटचाल, पक्षी अधिवास संवर्धन, पक्षी संवर्धन, राज्यातील नविन रामसर स्थळांची निर्मिती व रामसर स्थळांची सध्यस्थिती, पक्षी संशोधन, अभ्यास व संवर्धन संबंधित विषय व आवाहने आदी बाबत चर्चासत्रे होतील.

याप्रसंगी भाविक येरगुडे, सार्ड संस्था, विलास माथनकर, संजय जावडे, नितीन डोंगरे, महेद्र राळे, पुथ्वीमित्र पर्यावरण संस्था, आशिष घूमे, जंगल जर्नी च्या चित्रा इंगोले, स्वब नागभीड़ चे यश कायरकर, इको-प्रो चे बंडू धोतरे, बंडू दुधे, नितिन रामटेके, ललित मुल्लेवार, भद्रावती संदीप जीवने, सुमित कोहले, जयेश बैनलवार, बंडू दूधे, अभय अमृतकर, रोशन धोतरे, स्वप्निल मेश्राम, भूषण उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button