चंद्रपूर : ताडोबासह राज्यातील ५ व्याघ्र अभयारण्यात ७५ हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी : सुधीर मुनगंटीवार | पुढारी

चंद्रपूर : ताडोबासह राज्यातील ५ व्याघ्र अभयारण्यात ७५ हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा शाळकरी मुलांना जंगल आणि वन्यप्राण्यांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी, जैवविविधता कळावी, निसर्गाप्रती आत्मीयता निर्माण व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ताडोबासह राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पात 75 हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी घडवून आणण्यात येणार आहे. राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ताडोबाच्या वर्धापनदिनी ही घोषणा केली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हि माहिती दिली. जगात केवळ 14 देशांमध्ये वाघ शिल्लक असून, त्यात भारत अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या 203 आहे. अधिवास आणि वाघांच्या स्थलांतरणासाठी यथायोग्य मार्ग असल्याने येथील वाघ उन्नत होत आहेत. त्यांचे उत्तम पोषण येथे आहे, त्यामुळे ते राजबिंडे दिसतात. असे वाघ विद्यार्थ्यांना बघता यावेत, त्यांच्यात जंगलाप्रती प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी, वन्यजीवांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी यासाठी 75 हजार शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत जंगल सफारी घडवून आणणार असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

ताडोबासह नवेगांव नागझीरा, उमरेड-कर्‍हांडला, मेळघाट या व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांना ही सफारी घडवून आणली जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना वने व वन्यप्राण्यांवर आधारित लहानशी पुस्तिका, टी शर्ट, पेन, नोटबुक, चहा, नाश्ता व इतर साहित्य पुरवण्यात येणार आहे. या योजनेचा आराखडा तयार झाला आहे. लवकरच या योजनेची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. अशी योजना केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या शाळकरी विद्यार्थी व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवली गेली. सात हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतल्याचे त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा :  

Back to top button