नागपूर : कळमना ते राजनांदगाव थर्ड लाईनच्या कामाला वेग | पुढारी

नागपूर : कळमना ते राजनांदगाव थर्ड लाईनच्या कामाला वेग

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कळमना ते राजनांदगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कामाला वेग आला असून, या मार्गावरील विविध रेल्वेस्थानके या रेल्वे मार्गाशी जोडण्यात येत आहेत. याच मालिकेत आता गंगाझरी रेल्वे स्थानकालाही  जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावरील सर्व स्थानके तिसऱ्या मार्गाशी जोडल्यास प्रवासी वाहतुकीसह परिसरातील आर्थिक, सामाजिक विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर बातमी.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत राजनांदगाव ते कळमना हा एक महत्त्वपूर्ण तसेच नेहमी व्यस्त रेल्वे मार्ग आहे. विशेष म्हणजे नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकमार्गे हा मार्ग उत्तर भारताला जोडतो. प्रवासी वाहतूक अधिक गतिमान आणि सुरळीत करण्यासाठी या नवीन मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कळमना – राजनांदगाव रेल्वे मार्गाची लांबी 228 कि.मी. आहे. या मार्गावरील बहुतांश रेल्वे स्थानकांना थर्ड रेल्वे लाईनशी जोडण्यात आले आहे. हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जात आहे. काही ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आहे. नॉन-इंटरलाकिंगचे काम आज २४ फेब्रुवारीला सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत म्हणजे १२ तास करण्यात येणार आहे.
कोणत्याही रेल्वे मार्गाचे काम करताना प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर प्रचंड परिणाम होतो. गाड्या थांबवून ठेवणे, दुसऱ्या मार्गाने वळविणे या प्रकारामुळे प्रवाशांचा बराच वेळ जातो, प्रवाशांना कंटाळा येतो. मात्र, हे काम अत्याधुनिक यंत्रणा आणि विशिष्ट पद्धतीने करण्यात येत असल्याने रेल्वे गाड्यांवर या कामाचा कोणताही परिणाम नसल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

मार्ग उत्तर भारताशी जोडतो

राजनांदगाव – कळमना हा तिसरा रेल्वे मार्ग मध्य भारतातील विविध विभागांना उत्तर भारताशी जोडतो. नागपूर ते बिलासपूर आणि त्यापुढे मध्य भारत आणि दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, भोपाळ, जबलपूर, कोटा, अलाहाबादसारखी महत्त्वपूर्ण शहरे याच मार्गाने परस्परांशी जोडली जातात हे विशेष.
हेही वाचा

Back to top button