Sachin Tendulkar : सचिन तेंडूलकरच्या भेटीने अलीझंझा शाळेतील चिमुकले भारावले | पुढारी

Sachin Tendulkar : सचिन तेंडूलकरच्या भेटीने अलीझंझा शाळेतील चिमुकले भारावले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडूलकर  (Sachin Tendulkar) आता पाठ्यपुस्तकातून शिकविला जात आहे. परंतु ज्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून वाचलेला सचिन तेंडूलकर जर एखाद्या गावातील शाळेत येऊन भेटत असेल. तर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा होईल. अशीच स्थिती ताडोबा अभयारण्यातील अलीझंझा गावातील चिमुकल्यांची झाली. व्याघ्र पर्यटनाकरीता तीन दिवसांच्या ताडोबा मुक्कामी आलेल्या सचिनने येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. ही भेट विद्यार्थीसाठी अविस्मरणीय ठरली.

सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar)  पत्नी अंजली व मित्रांसह ताडोबातील बांबू रिसार्टमध्ये 18 फेब्रुवारीच्या रात्री दाखल झाला. रविवार, सोमवार व मंगळवारी त्यांनी व्याघ्रदर्शन केले. सफारी दरम्यान त्यांना झरणी, बिजली, तारा, बबली, छोटा मटका, भानुसखिंडी, झुणाबाई व काळा बिबट सारख्या वाघ व वाघिणींचे दर्शन झाले. तीन दिवसांच्या मुक्कामात सचिन यांना ताडोबातील वने व वन्य प्राण्यांचे दर्शन घेतले. 20 फेब्रुवारीला सकाळी सफारी आटोपली. अलीझंझा गेट वरून परत येताना रस्त्यालगतच जि.प. प्राथमिक शाळा आहे. येथे 4 वर्ग आहेत. विद्यार्थ्यांची संख्या अवघी 16 आहे. शिक्षक रमेश बदके व शिक्षिका मनिषा बावणकर कार्यरत आहेत. सचिनने या शाळेला अचानक भेट दिली.

इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात सचिनवर ‘कोलाज’ नावाचा पाठ आहे. त्यामुळे सचिनचे शाळेत अचानक आगमन होताच चिमुकल्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सचिनने चिमुकल्यांना काय बनायचे आहे? याबाबत विचारले. चिमुकल्यांनी डॉक्टर, इंजिनिअर अशी उत्तरे दिली. शिक्षण, खेळ व त्यांच्या आवडीनिवडी याबाबत सचिन व पत्नी अंजली यांनी जाणून घेतले. यावेळी पुस्तकातील सचिनचा पाठ चिमुकल्यांनी उघडून दाखविला आणि सचिन आनंदी झाला. पुस्तकातील सचिन… सचिन म्हणून चिमुकल्यांनी पुस्तके उघडली. पुस्तकातील सचिन व शाळेत आलेला सचिन चिमुकले न्याहाळू लागले. पुस्तकात, टीव्ही व क्रिकेटच्या मैदानावर पाहिलेला सचिनच शाळेत आल्याने चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

हेही वाचा 

Back to top button