

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : जंगलात जनावरे घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी (दि. २२) सिंदेवाही वनपरीक्षेत्र अंतर्गत कच्चेपार बिटात सायंकाळच्या सुमारास घडली. बाबुराव लक्ष्मण देवताळे (वय 56) रा. कच्चेपार असे जखमी गुराख्योचे नाव आहे. हा म्हैसी व गाईगुरे चारून घराकडे आणीत असतांना 5-30 सुमारास पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार बिटातील जंगलात 56 वर्षीय गुराखी बाबुराव लक्ष्मण देवताळे हा सकाळी जनावरे घेऊन चारण्याकरीता गेला होता. दिवसभर जंगजात जनावरे चारल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परत घेऊन येत होता. गावापासून काही अंतरावर दबा धरन बसलेल्या पट्टेदार वाघाने ज्याचेवर हल्ला केला. यामध्ये गुराखी गंभीर जखमी झाला. दरम्यान येथीलच संजय नैताम हा आपल्या शेतावरून तणीस घेऊन गावाकउे जात असताना त्याला वाघासेाबत गुराख्याची झटापट सुरू असल्याची घटना निदर्शनास आली. त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचे तणीस फेकून गावच्या दिशेने धाव घेतली. गावात जावून या घटनेची माहिती दिली व गावकऱ्यांना बोलावून आणले. गावकरी जंगलात आले तेव्हा गुराखी वाघाच्या तावडीत रक्तबंबाळ अवस्थेत सापडला होता. नागरिकांनी घटनास्थळी येऊन प्रचंड कल्लोळ केल्याने वाधाने गुराख्याला सोडून धूम ठोकली. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांनी गंभीर जखमी बाबुराव देवताळे याला तत्काळ प्राथमिक उपचाराकरीता सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी वनपरीक्षेत्राधिकारी सालकर, उपक्षेत्र अधिकारी हटवार, पेंदोर,वनरक्षक कोहाडे, चौधरी उपस्थित झाले. गुराखी गंभीर जखमी असल्याने तातडीने त्याला पुढील उपचाराकरीता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रसंगी गुराख्याला वनविभागाने 5 हजाराची आर्थिक मदत केली.