नागपूर : ब्रह्मपुरी वन क्षेत्रातून दोन वाघिणींची नवेगाव-नागझिरात पाठवणी | पुढारी

नागपूर : ब्रह्मपुरी वन क्षेत्रातून दोन वाघिणींची नवेगाव-नागझिरात पाठवणी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघांची वाढती संख्या आणि वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या घटना लक्षात घेऊन वन विभागाने चार वाघिणींच्या स्थलांतरासाठी प्रस्ताप दिला होता. या प्रस्तावाला गती मिळाली असून पहिल्या टप्प्यात दोन वाघिणींचे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर केले जाणार आहे. यासाठी वन विभागाने १५ कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे. भारतीय वन्यजीव संस्थेचे तज्ज्ञ बिलाल हबीब यांची याकामी मदत घेतली जात आहे. वाघिणींचे हे स्थलांतरण यशस्वी ठरल्यास आणखी दोन वाघिणींना येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चार वाघिणींना सोडण्याचा निर्णय वन विभागाने काही महिन्यांपूर्वी घेतला. पहिल्या टप्प्यात पुढील दहा दिवसांत दोन वाघिणींना सोडण्यात येणार आहे. नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पात तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठी असल्याने वाघांना शिकार सहज उपलब्ध होऊ शकेल, ही बाब लक्षात घेऊनच या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. वाघांच्या स्थलांतरणासाठी वन विभागाने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेतली आहे. गेल्यावर्षी १५ सप्टेंबरलाच यासंदर्भात मंजुरी मिळाली आहे.

राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत येथील वाघांच्या स्थलांतरणाचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी मे २०२२ मध्ये मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतर एनटीसीए च्या तांत्रिक समितीकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या तज्ज्ञांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प परिसराची पाहणीही केली होती.

हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button