नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कायदा आणि समाजाला, न्यायाच्या समांतर आणण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांनी घटनात्मक मूल्यांसह पुढाकार घेणे आवश्यक आहे. समाजातील विषमता आणि जातीभेद यांच्यावर मात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेत परिवर्तनाची क्षमता आहे. प्रास्ताविकेत राज्यघटनेचे तत्त्व अंगीकृत केले आहे. त्यामुळे आपण विधिज्ञ म्हणून आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय सर्वांना देण्याचे वचन दिले पाहिजे, असे आवाहन सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले. येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी त्यांनी 'दया' आणि 'न्याय' यांच्यातील फरकही अधोरेखित केला. न्यायामुळे समाज सक्षम आणि स्वयंपूर्ण होतो; तर दयेमुळे केवळ काही क्षणासाठी अन्यायाचे दुःख दूर होते. केवळ दयादानाचे काम न करता न्यायदानाला अनुकूल असे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे. न्यायदानाचे लक्ष्य प्राप्त करताना न्यायाची दयेसोबत गफलत करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सोहळ्याला माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विधी विद्यापीठाचे कुलपती न्या. भूषण गवई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश आणि प्रकुलगुरू संजय गंगापूरवाला, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार उपस्थित होते.