

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि इतरांनी केवळ सात-आठ महिन्याकरिता रिक्त विधानसभा निवडणुक लढू नये. ही जागा भाजपाची असल्याने ती भाजपासाठी सोडावी अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध होणार नाही, या विरोधकांच्या भूमिकेवर ते विभागीय भाजपा कार्यालयात माध्यमांशी बोलत होते.
कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपच्या असल्याने, बोलण्याची जबाबदारी आमची आहे. देवेंद्रजी फडणवीस हे भाजपाचे नेते आहेत ते याविषयी बोलतीलच पण ही इतर विरोधी पक्ष आणि मविआ ने लढू नये यासाठी मी नेत्यांशी संपर्क केल तसेच पत्रही लिहिणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
सत्यजित तांबे अपक्ष होते म्हणून त्यांना भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मदत केली. ते अपक्ष आहेत हा त्यांचा निर्णय आहे. सत्यजित तांबे हे मविआच्या विरुद्ध निवडून आले. कुठे जायचे हा त्यांचा निर्णय आहे. तूर्त त्यांनी अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान,भाजपाने तांबे यांना प्रवेशाची ऑफर दिली नाही. पण त्यांना वाटल्यास त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे उघडे राहतील. अमरावतीच्या निकालावर बोलताना धीरज लिंगाडे नशीबाचे धनी आहेत. त्यामुळे मला यावर फार काही बोलायचे नाही, असे म्हणत आम्ही या पराभवावर चिंतन करू आणि काय चुकले याचा अभ्यास करून पुढे जाऊ, असेही ते म्हणाले.
केंद्र व राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळेल. भाजपा निवडणुकीसाठी तयारी कधीच करीत नाही. पक्ष नेहमीच निवडणुकीसाठी तयार असतो यावर बावनकुळे यांनी भर दिला.