Maharashtra MLC Election | अमरावती पदवीधरमध्ये ‘मविआ’चे धीरज लिंगाडे विजयी, भाजपला धक्का, ३० तास चालली मतमोजणी | पुढारी

Maharashtra MLC Election | अमरावती पदवीधरमध्ये 'मविआ'चे धीरज लिंगाडे विजयी, भाजपला धक्का, ३० तास चालली मतमोजणी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. यामुळे मविआचे धीरज लिंगाडे यांचा विजय झाला असून निवडणूक आयोगाकडून केवळ विजयाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे. विजयासाठी निश्चित केलेला ४७ हजार १०१ मतांचा कोटा कोणत्याच उमेदवाराने पूर्ण केला नाही. त्यामुळे सर्वाधिक मते घेणारे लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार तसेच माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव केला. बाद फेरी अखेर मविआचे धीरज लिंगाडे यांनी ४६ हजार ३४४ मते प्राप्त केली. तर रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरिता पाठवली आहे. (Maharashtra MLC Election)

अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी बडनेरा रोडवरील नेमानी गोडाऊन येथे २ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता सुरू झाली. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज शिंगाडे हे ४३ हजार ३४० मते घेऊन आघाडीवर राहिले. माजी मंत्री तथा भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना ४१ हजार २७ मते मिळाली आहे. त्यावेळी अवैध ठरलेल्या ८ हजार ७३५ मतांची फेरमोजणी करण्याची मागणी रणजीत पाटील यांच्या प्रतिनिधींनी केली केली आहे. या अवैध मतांची फेरमोजणी झाल्यानंतर बाद फेरीस सुरुवात करण्यात आली.

बाद फेरीतही लिंगाडे यांची आघाडी

अवैध मतांची फेर मोजणी करण्यात आल्यानंतर देखील फारसा फरक न पडल्याने बाद फेरीची मतमोजणी सुरू करण्यात आली. यात सर्वाधिक कमी मते पडलेल्या उमेदवाराच्या मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. यात निलेश दिपकपंत पवार (राजे), लक्ष्मीकांत नारायण तडसे, धनराज किसनराव शेंडे, सुहास विठ्ठलराव ठाकरे, अनिल वकटुजी ठवरे, रणवीर संदेश गौतमराव, प्रवीण डिगांबर बोंद्रे, विकेश गोकुलराव गवाले, पाटील उपेंद्र बाबाराव, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, संदीप बाबुलाल मेश्राम, अनंत राघवजी चौधरी, श्रीमती माधुरी अरुणराव डाहारे, प्रजापती श्याम जगमोहन, डॉ. गौरव आर गवई, भारती ख. दाभाडे, अॅड. आनंद राठोड, शरद झांबरे पाटील, अरुण सरनाईक, डॉ. प्रवीण चौधरी, अनिल अमलकर हे उमेदवार बाद झाले. बाद फेरीनंतर मविआचे धीरज लिंगाडे यांनी ४६ हजार ३४४ मते प्राप्त केली. तर रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली. मात्र, त्यानंतर देखील लिंगाडे यांनी निर्धारित करण्यात आलेला विजयाचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे अंतिम आकडेवारी घोषित करीत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली.

१ लाख २ हजार ५८७ मतदारांनी केले होते मतदान

अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण १ लाख २ हजार ५८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीत ९३ हजार ८५२ मते वैध ठरली आहे. तर तब्बल ८ हजार ७३५ एवढी मते अवैध ठरवण्यात आली. पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे हे ४३ हजार ३४० मते घेऊन आघाडीवर आहे. तर मावळते आमदार डॉ. रणजीत पाटील यांना ४१ हजार २७ मते मिळाली. लिंगाडे यांनी २ हजार ३१३ मतांची आघाडी घेतली आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल ओंकार अमलकार यांना ४१८१ मते, अरुण रामराव सरनाईक यांना १५३६, डॉ. प्रवीण चौधरी यांना १६८५ मते, शरद झांबरे यांना ४२० मते मिळाली. सुरुवातीला पोस्टल बॅलेट ची मोजणी करण्यात आली. एकूण २६५ पोस्टल बॅलेट प्राप्त झाले होते त्यापैकी ७३ बॅलेट तर १९२ ठरविण्यात आले. पोस्टल बॅलेट मध्ये देखील लिंगाडे हे ८८ मतांनी पुढे होते.

काँग्रेसचा जल्लोष

महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा विजय निश्चित झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्रीच शहरातील राजकमल चौकात जल्लोष साजरा केला. (Maharashtra MLC Election)

हे ही वाचा :

Back to top button