आईचा खून करून पोलीस स्टेशनमध्ये शरण; नागपूरच्या वनदेवी नगरातील घटना | पुढारी

आईचा खून करून पोलीस स्टेशनमध्ये शरण; नागपूरच्या वनदेवी नगरातील घटना

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बेरोजगार आणि दारूच्या आहारी गेलेल्या युवकाने पैशाच्या लोभापायी आपल्या आईचा खून केला. यानंतर भांबावलेल्या अवस्थेत तो यशोधरा पोलीस स्टेशनला शरण आला. त्याने स्वतः पोलिसांना आपल्या कृत्याची कबुली दिली.

नागपूरच्या यशोधरा पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या वनदेवी नगर येथे आज (दि.२९) सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. गोविंद काटकर असे या माथेफिरूचे नाव असून मृत महिलेचे नाव इमलाबाई काटकर असे आहे. माथेफिरूचे वडील मोलमजुरी करीत होते काही वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले.

गोविंदने आज आईकडे पैसे मागितले होते. मात्र, आईने ते देण्यास नकार दिला. याचा संताप अनावर झाल्याने गोविंदने स्वत:ची जन्मदात्री आई (वय ६०) इमलाबाई काटकर यांचा खून केला. विशेष म्हणजे त्याला दारूचे व्यसन असले तरी नेमका यावेळी तो दारू पिलेला नव्हता अशी माहिती पुढे आल्याने त्याच्यासोबत या हत्येत कुणी सहभागी आहेत का यासह इतरही कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.

हेही वाचा;

Back to top button