भंडारा: रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत पादचारी ठार | पुढारी

भंडारा: रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या भरधाव वाहनाने पादचाऱ्यास धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२८) सकाळी ७:३० च्या सुमारास पिंपळगाव, सडक पटाची टोली येथे घडली. रवींद्र श्रावण रामटेके (वय ५७, रा. दिघोरी/नान्होरी, ता. लाखनी) असे मृताचे नाव आहे. या अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रवींद्र रामटेके हा पिंपळगाव/सडक येथील शंकरपट पाहण्यासाठी गेला होता. सासुरवाडीत मुक्काम करून पट संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावाकडे येत होता. यावेळी महामार्ग ओलांडताना लाखनीकडून साकोलीकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात त्याला धडक दिली. यात तो जागीच ठार झाला.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी, पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलीस हवालदार निलेश रामटेके, सुरेश आत्राम घटनास्थळी दाखल झाले.

लाखनी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी तपास करीत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दिघोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र रामटेके यांच्यामागे पत्नी, २ मुली व १ मुलगा असा आप्त परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button