नागपूर : नॉट रिचेबल सतीश इटकेलवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी | पुढारी

नागपूर : नॉट रिचेबल सतीश इटकेलवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : नागपूर शिक्षक विधान परिषद निवडणुकीतून आज (दि.१६) शिवसेनाच्या गंगाधर नाकाडे यांच्यासह पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 22 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे महाआघाडीने नाशिकच्या गोंधळात नागपूरचे उमेदवार बदलले. मविआने सुधाकर अडबाले यांना समर्थन दिले असले, तरी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार यांचे अर्ज कायम असल्याने मविआचे मतविभाजन अटळ दिसत आहे. सतीश इटकेलवार यांची आज तातडीने पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शहर अध्यक्ष दूनेशवर पेठे यांनी दिली.

नागपुरात २७ उमेदवारांचे अर्ज होते. यापैकी नीलकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके, मृत्युंजय सिंग आणि गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे २२ उमेदवार या निवडणुकीत आता नशीब अजमावणार आहेत. मातोश्रीवरून कॉल आल्यानंतर नाकाडे यांनी शेवटच्या क्षणी हा निर्णय घेतल्याचे कळते. नाकाडे यांनी सहा महिन्यांपासून तयारी केली होती. गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक सेनेचा मी विभागीय अध्यक्ष आहे.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष अभ्यंकर यांचा फोन आला. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितला. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी सांगतील, त्या उमेदवाराचे काम करू. आमचा हिरमोड नक्कीच झाला आहे, असे नाकाडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button