भंडारा: विविध मागण्यांसाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन | पुढारी

भंडारा: विविध मागण्यांसाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सुमारे १० हजार आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन पुकारले होते. भंडारा जिल्ह्यातही आरोग्य अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

गेल्या सहा वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी उत्तमरित्या सेवा प्रदान करीत आहेत. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेला देशात तिसऱ्या क्रमांकावर आणण्यामध्ये या सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. परंतु, प्रमाणिकपणे सेवा प्रदान करीत असताना समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या व आर्थिक नुकसान त्यांचे मनोबल खच्चीकरण करीत आहे. तरी कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्यातील १० हजार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन पुकारले.

या अधिकाऱ्यांना सेवेत कायम करुन गट ब अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ४० हजार मानधनावर वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस देण्यात यावा. निश्चित वेतन व कामावर आधारीत वेतन यांचे प्रमाण बदलून निश्चित वेतन ३६ हजार रुपये व कामावर आधारित वेतन ४ हजार रुपये करण्यात यावे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात धोरण निश्चित करण्यात यावे. २३ इंडिकेटरचे कामावर आधारीत मोबदला रद्द करण्यात यावा. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बढती देण्यात यावी. हार्ड एरिया अलाऊंस देण्यात येणाऱ्या क्षेत्राच्या यादीत शासन निर्णयानुसार समाविष्ट क्षेत्राचा अंतर्भाव करण्यात यावा. टीए-डीए देण्यात यावा. आदी मागण्यां यावेळी करण्यात आल्या.

या सर्व मागण्यांवर विचार न झाल्यास २३ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत कामबंदचा इशारा देण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा यांना पाठविले. या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील १५० आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button