चंद्रपूर जिल्ह्यात दोन लाखाचा नायलॉन मांजा जप्त | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात दोन लाखाचा नायलॉन मांजा जप्त

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात नायलॉन मांजाची खरेदी विक्री करण्या-या विरोधात पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. ठीक ठिकाणी सुमारे दोन लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

१५ जानेवारीला मकरसक्रांत असून या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उडवून सण उत्साहात साजरा केला जातो. परंतु पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर करण्यात येत असल्यामुळे मानव व प्राणी जिवीतास निर्माण धोका निर्माण होत आहे. त्यामुळे नायलाॅन मांजावर बंदी घालण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेला प्रतिबंधीत नायलॉन मांजा खरेदी व विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. चंद्रपूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवुन मांजा विक्री करणारे दुकानांची तपासणी केली असता प्रतिबंधीत नायलॉन मांजा खरेदी व विक्री करताना आढळून आले. ज्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे, त्यामध्ये पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर, रामनगर, वरोरा, घुग्घुस, दुर्गापूर, मुल, शेगांव हद्दीत संबंधीत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथकाने कारवाई केली. १२ ठिकाणच्या कारवाईत १ लाख ९५ हजार ३३५ रूपयाचा नायलाॅन मांजा जप्त करण्यात आला. प्रतिबंधीत नायलाॅन मांजा खरेदी विक्री करणा-या विरोधात कारवाईची मोहीम जिल्हयात नियमित सुरु राहणार आहे.

नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती द्या

जिल्ह्यातील नागरिकांनी आपले पाल्य तथा शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून “मी पंतग उडविताना नायलॉन मांजा वापरणार नाही आणि इतर कोणालाही वापरू देणार “नाही” असा संकल्प करून घ्यावा. पालकांनी पाल्य पतंग उडविताना कोणता मांजा वापरतो का? याकडे लक्ष ठेवावे. तसेच त्यांच्याकडे नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमाकांवर किंवा जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button