नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ भाजपची पुन्हा नागो गाणार यांना पसंती | पुढारी

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ भाजपची पुन्हा नागो गाणार यांना पसंती

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा एकदा नागो गाणार यांना उमेदवारी घोषित केली आहे. या घोषणेमुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेली अनिश्चितता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघात गाणार हे दोन टर्म आमदार राहिलेले आहेत.

यावेळी  नागो गाणार यांना  पुन्हा संधी मिळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. शिक्षक परिषदेने दुसऱ्या उमेदवारास संधी द्यावी, असेही प्रयत्न भाजपकडून झाले. मात्र, अखेर पुन्हा एकदा गाणार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याचा  १२ जानेवारी हा शेवटचा दिवस असून, गाणार हे शेवटच्या दिवशीच अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे.

या निवडणुकीत शिक्षक भारती राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडी दीपराज खोब्रागडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले आणि भाजप समर्थीत शिक्षक परिषदेचे नागो गाणार अशा या बहुरंगी लढतीत आता काँग्रेस उमेदवार म्हणून कोणाला उतरविणार, याकडे लक्ष लागलेले आहे.

काँग्रेस पक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर करेल, अशीही शक्यता आहे. प्रहारचे बच्चू कडू हे मेस्टा संघटनेसह राज्यातील पाचही मतदारसंघ लढविणार आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे कडू यांच्याकडून आजच उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, आज त्याच्या अपघातामुळे काहीसा उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :  

Back to top button