विदर्भात थंडीचा तडाखा वाढला, पारा ८ अंशावर | पुढारी

विदर्भात थंडीचा तडाखा वाढला, पारा ८ अंशावर

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : तीन दिवस ढगाळ वातावरणानंतर आकाश निरभ्र होताच नागपूरसह विदर्भातील तापमानात सातत्याने घट होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे सुटीचा दिवस असल्याने रविवारी अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले. नागपुरात पारा ८ अंशावर आला असून रविवार हा सर्वात कमी तापमान असलेला दिवस ठरला. पुढील पाच दिवस विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

२४ तासात किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. उपराजधानीत आठ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून गोंदियात सर्वाधिक कमी ६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील जवळजवळ सर्वच शहरात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वाऱ्याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. दक्षिण बंगालच्या खाडीत चक्रीवारे सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस मध्यप्रदेश आणि उत्तर पूर्व विदर्भात थंडीची लाट राहील. उर्वरित महाराष्ट्रात तापमान कमी होईल, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे.

गोंदिया आणि नागपूर पाठोपाठ वर्धा व गडचिरोली शहरात ९.४ तर ब्रम्हपुरी येथे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. फेब्रुवारी महिन्यात देखील थंडी कायम राहील असा अभ्यासकांचा अंदाज आहे. गारठा वाढत असल्याने दमा, अस्थम्याचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहाम मुलांची काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button