बालकांमधील जिज्ञासा, प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान काँग्रेस कटीबद्ध : डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना | पुढारी

बालकांमधील जिज्ञासा, प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान काँग्रेस कटीबद्ध : डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : बालकांमध्ये प्रचंड वैज्ञानिक जिज्ञासा आहे. आजची ही बालके उद्याची ‘यंग सायंटिफीक ब्रिगेड’ आहे. बालकांमधील जिज्ञासा आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठीच भारतीय विज्ञान काँग्रेस कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॅा. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी केले.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी डॉ. सक्सेना बोलत होत्या. ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वाटे, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान कम्युनिकेशनचे प्रमुख डॉ. मनोरंजन मोहंती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे कुलगुरु डॅा. सुभाष चौधरी, भारतीय विज्ञान काँग्रेसचे सचिव डॅा.एस. रामकृष्णन, डॉ. अनुपकुमार जैन, डॅा. सुजित बॅनर्जी, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक संमेलनाचे संयोजक डॅा. निशिकांत राऊत उपस्थित होते.

वैज्ञानिक संशोधन, पर्यावरण, उत्पादन यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेस काम करत आहे. बालकांमध्ये वैज्ञानिक संशोधनवृत्ती वाढीस लागली पाहिजे, त्यासाठी दरवर्षी केवळ बालकांसाठी राष्ट्रीय वैज्ञानिक संमेलन आयोजित केले जाते. तंत्रज्ञानविषयक तत्व समजून घेऊन ते विकसित करण्यासाठी बालकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील नाविन्याचा शोध घेणे व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक जागृती घडविण्याचे काम भारतीय विज्ञान काँग्रेस करीत असल्यावर डॅा. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी भर दिला.

प्रास्ताविक कुलगुरु डॅा. सुभाष चौधरी यांनी केले. डॅा. रामकृष्णन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संमेलनानिमित्त बाल वैज्ञानिकांसाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहल मून यांनी सूत्रसंचलन तर डॅा.निशिकांत राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास बाल वैज्ञानिकांसह शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button