भाजपच्या ‘मिशन 145’ची सुरुवात चंद्रपुरातून | पुढारी

भाजपच्या ‘मिशन 145’ची सुरुवात चंद्रपुरातून

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वामुळेच देशातील सर्वसामान्यांना न्याय मिळाला असून, त्याच जोरावर भाजपचे ‘मिशन 145’ यशस्वी होईल आणि चंद्रपूरच्या विजयापासून त्याला प्रारंभ होईल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. चंद्रपुरात ‘मिशन 145 विजय संकल्प’ मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली.

भाजपच्या ‘मिशन 145 विजय संकल्पा’ची महाराष्ट्रातील चंद्रपुरातून सोमवारी (दि. 2) सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ते जाहीर सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार अशोक नेते, खासदार रामदास तडस, खासदार अनिल बोंडे, मनोज कोटक, संदीप रेड्डी व भाजप पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. माता महाकाली आणि स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांना स्मरण करून जे. पी. नड्डा यांनी भाषणाला सुरुवात केली.

मोदी यांच्यामुळे भारताची मान उंचावली

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना नड्डा म्हणाले की, जगातील प्रत्येक देश संकटात असताना 130 कोटींच्या भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. विपरीत परिस्थितीत देशाला पुढे नेताना आज मंदीच्या काळात ब्रिटनला मागे टाकत जगात भारत पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. भारत जगात निर्यातदार बनला असून, जगातील अर्थव्यवस्था गडगडली असताना मोदींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने केलेली लसींची निर्मिती हे जगाला वरदान आहे. 100 देशांना भारताने लसींचा पुरवठा केला. जे काम काँग्रेसला शंभर वर्षांत जमले नाही, ते काम संकटसमयी नरेंद्र मोदींनी फक्त 9 महिन्यांत करून दाखविले, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आवर्जून उल्लेख करीत नड्डा म्हणाले की, शौचालय योजना, प्रधानमंत्री सन्मान योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, अनेक विकास योजना, यामुळे विकासाचे दुसरे नाव भारतीय जनता पक्ष आणि विकासपुरुषाचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी असल्याचे ते म्हणाले.

Back to top button