…तर नाथाभाऊंनी माझे लग्नच थांबविले असते; फडणवीसांचा खडसेंना टोला | पुढारी

...तर नाथाभाऊंनी माझे लग्नच थांबविले असते; फडणवीसांचा खडसेंना टोला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  ‘विदर्भ वेगळा होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी घोषणा मी केल्याचा शोध आमच्या नाथाभाऊंनी लावला. अहो नाथाभाऊ, असे काय करताय. माझ्या लग्नाच्या वेळी तुम्ही होतात ना. तेव्हा तर तुम्ही आमचे नेते होतात. अशी काही घोषणा केली असती तर तुम्ही माझे लग्नच थांबवले असते ना!’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांच्या दाव्यातील हवा काढून घेतली.

अरे देवेंद्र लग्न बंद. वेगळ्या विदर्भासाठी तू घोषणा केली होतीस. त्यामुळे तुला लग्न करता येणार नाही. पण मी अशी घोषणा कधी केलीच नव्हती. त्यामुळे कुणी काही लिहिले म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, असे ते म्हणाले. सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी विधान परिषदेत नियम 260 अन्वये विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील अविकसित भागासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी सभागृहात यावर भाषणे केली. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्या लग्नाचा मुद्दा उपस्थित केला होता. “जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या प्रतिज्ञेचे काय झाले, वेगळा विदर्भ झाला का, वेगळ्या विदर्भाचे काय झाले, शब्द दिला तर तो पाळायचा ना?” अशा प्रश्नांचा भडिमार आपल्या भाषणात केला होता. एकनाथ खडसे यांचा हा दावा सोशल मीडियावर बराच व्हायरलही झाला. याची दखल घेत फडणवीस यांनी आपल्या उत्तराच्या भाषणात याचा खुलासा करून टाकला. एक जागा दाखवा, जिथे मी अशी घोषणा केली. आपण अशाच घोषणा करतो की, ज्या आपल्याला पूर्ण करता येतात, असे उत्तर फडणवीस यांनी दिले.

Back to top button