गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : कुरखेडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि गटनेत्याचा व्हीप झुगारल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज भाजपच्या नगरसेविका जयश्री रासेकर यांचे सदस्यत्व रद्द केले. या निर्णयामुळे नगर पंचायतीतील शिवसेना-काँग्रेस आघाडीची सत्ता संपुष्टात आली आहे. सध्या भाजप आणि शिवसेना-काँग्रेस आघाडीडे प्रत्येकी ८ सदस्य आहेत.
जानेवारी २०२२ मध्ये कुरखेडा नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. यात भाजपचे ९, शिवसेनेचे ५ व काँग्रेसचे ३ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर भाजपच्या ९ सदस्यांनी सभा घेऊन मोहम्मद कलाम शेख यांची नगर पंचायतीतील भाजपचे गटनेते म्हणून निवड करून याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केली. पुढे १४ फेब्रुवारी २०२२ ला नगराध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी ६ फेब्रुवारीला भाजपच्या सदस्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करावे, यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आणि गटनेते मोहम्म्द कलाम शेख यांनी पक्षाच्या नगरसेवकांना व्हीप जारी करुन निवडणुकीच्या दिवशी तो वृत्तपत्रात प्रकाशित केला होता. परंतु भाजपच्या नगरसेविका जयश्री रासेकर यांनी व्हीप न पाळता शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले. त्यानंतर गटनेते कलाम शेख यांनी रासेकर यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. जिल्हाधिकाऱ्यांनी रासेकर यांना नोटीस पाठवून १६ मार्च २०२२ रोजी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर तीन वेळा संधी देऊनही रासेकर यांनी उत्तर सादर केले नाही. अखेर आज जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी रासेकर यांचे सदस्यत्व रद्द केले.
कुरखेडा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्यानंतर कंत्राटदार असलेल्या एका सदस्याने शिल्लक राहिलेली कामे करण्याचा ठराव घेतला आणि पुढे देयकेही काढली. यासंदर्भात आम आदमी पक्षाचे ईश्वर ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे या नगरसेवकावरही टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.