बाळासाहेब ठाकरे फक्त आमचेच : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

बाळासाहेब ठाकरे फक्त आमचेच : मुख्यमंत्री शिंदे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही खुर्चीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलात, त्या दिवशी बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचाही अधिकार तुम्हाला राहिला नाही. तो अधिकार आम्हाला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर विरोधीपक्षांच्या अल्पकालीन चर्चेत शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटात राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. या चर्चेवरील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला उत्तर देताना अनिल परब यांनी शिंदे गटाच्या राजकीय भविष्यावरून डिवचले. आपण कर्तृत्वावान आहात. आपण ५० लोक घेऊन गेलात आणि सरकार स्थापन केले. त्यातला एक जरी पडला, तरी राजीनामा देईन, हे तुमचे वाक्य आहे. आपल्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. फक्त एकच हात जोडून विनंती आहे, की बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा की पुढच्या वेळी भाजपाच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही, असे परब म्हणाले.

यावर, तुम्ही चिंता करू नका, तुमच्याकडे जे खासदार आणि आमदार आहेत ते मोदींचा फोटो लावून निवडून आले आहेत. तुम्ही खुर्चीसाठी काँग्रेससोबत गेला त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाला हात लावायचा अधिकार तुम्हाला नाही  तो अधिकार आम्हाला आहे, असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. आमचा संयम म्हणजे आमची हतबलता नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बोलत नाही, करून दाखवतो. असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदेने यांनी दिले.

Back to top button