नियमबाह्य काम केले असेल तर न्यायालय देईल ती शिक्षा भोगायला तयार : अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार,www.pudhari.news
अब्दुल सत्तार,www.pudhari.news

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  वाशिम जिल्ह्यातील कथित गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा आणि सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी रुपयांची वसुली केल्याच्या आरोपांवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत बुधवारी खुलासा केला. मी सद्सदविवेकबुद्धीला स्मरून हा निर्णय घेतला. या प्रकरणात आपण कोणतेही नियमबाह्य काम केलेले नसून न्यायालय जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला होता. विरोधी बाके खाली असताना सत्तार यांनी आपला हा खुलासा केला.

सत्तार यांनी महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यात घोडबाभूळ गावात ३७ एकर १९ गुंठे जमिनीचे एका खासगी व्यक्तीला बेकायदा वाटप केल्याचा मुद्दा तसेच सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आयोजित केलेल्या सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभागाद्वारे राज्यभर वसुली करण्यात आल्याचा आरोप करीत विरोधकांनी सोमवारी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जमीनवाटपावरून सत्तार यांच्याविरोधात कडक ताशेरेही ओढल्याने त्यावरून विरोधकांना अधिवेशनात मुद्दा मिळाला होता. मात्र, सोमवारी आरोप करणारे विरोधक मंगळवारी आणि बुधवारी शांत होते. त्यातच सत्तार यांनी विरोधक सभागृहात नसताना आपला खुलासा करीत सर्व आरोप फेटाळून लावले.

गायरान जमीन नियमानुसारच हस्तांतरित केली आहे. वारसा नोंदी आणि जमीन कसत असल्याचे पुरावे माझ्यासमोर आल्यामुळे तथ्यांच्या आधारे मी हा निर्णय घेतला. माझ्या निर्णयामुळे कुणाचा फायदा अथवा नुकसान झालेले नाही. तसेच सरकारचेही नुकसान झालेले नाही, असे सत्तार यांनी सांगितले. सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभागाची यंत्रणा कामाला लावून १५ कोटी रुपयांची वसुली सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, याप्रकरणी सत्तार यांनी विधानसभेत कोणताही खुलासा न करता मौन बाळगले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news