चंद्रपूर : अखेर ऊर्जाग्राम परिसरातील वाघ जेरबंद | पुढारी

चंद्रपूर : अखेर ऊर्जाग्राम परिसरातील वाघ जेरबंद

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसांपासून भद्रावती तालुक्यातील घोडपेठ लगतच्या ऊर्जाग्राम येथील वेकोली वणी क्षेत्राच्या केंद्रीय कार्यशाळा परिसरात घुसलेल्या वाघाला जेरबंद करण्यात चंद्रपूर वन विभागाला बुधवारी (दि.२८) यश आले. दरम्यान, वाघाला जेरबंद करण्यात आल्याने कर्मचारी आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सोमवारी (दि.२६) एक पट्टेदार वाघ ऊर्जाग्राम येथील वेकोली वणी क्षेत्राच्या केंद्रीय कार्यशाळा परिसरात घुसला होता. यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीमय वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे चंद्रपूर वन विभागाकडे वाघाला जेरबंद करण्याकरीता माहिती देण्यात आली होती. या वाघावर निगराणी ठेवण्यासाठी वन विभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले होते. दरम्यान, वाघाच्या भीतीमुळे सावधगिरीचा उपाय म्हणून येथील कर्मचाऱ्यांना दोन दिवसाची रजा देण्यात आली होती.

वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने परिसरात पिंजरे लावले होते. त्यामध्ये जनावरांचे खाद्यान्न ठे़ण्यात आले होते. पिंजऱ्यातील भक्ष्य टिपण्यासाठी वाघाने या पिंजऱ्यात प्रवेश केला व त्यात तो अलगदपणे अडकला. त्यानंतर वनविभागाने पिंजऱ्यात अडकलेल्या वाघाला सुरक्षितस्थळी हलविले आहे. वाघाच्या या बंदोबस्तामुळे या परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या थराराचा शेवट झाला.

हेही वाचंलत का?

Back to top button