अकोला : ‘पदवीधर’चे उमेदवार शरद पाटील झांबरे यांचे पोस्टर्स फाडले

अकोला : ‘पदवीधर’चे उमेदवार शरद पाटील झांबरे यांचे पोस्टर्स फाडले

अकोला: पुढारी वृत्तसेवा : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आणि 'पदवीधर युवा शक्ती असोसिएशन'चे अध्यक्ष शरद पाटील झांबरे यांचे अकोला शहरातील पोस्टर्स, बॅनर्स चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचबरोबर काही भागातील त्यांचे बॅनर्स फाडल्याचा प्रकारही समोर आला आहे. गेल्या महिनाभरात अकोला शहरातील विविध भागात हे प्रकार घडले आहेत. याविरोधात शरद झांबरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

अकोला शहरातील सिव्हील लाईन, रामदासपेठ, खदान आणि डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पोस्टर्स चोरीला गेले आहेत. झांबरे यांनी मतदार नोंदणीचे आवाहन करणारे जठारपेठ भागात लावलेले होर्डींग्ज अज्ञातांनी पहिल्यांदा फाडले. त्यानंतर असेच प्रकार सिव्हील लाईन आणि डाबकीरोड भागात झाले आहेत. यानंतर शहरातील विविध भागांतील झांबरे यांचा प्रचार करणारे बॅनर्स, पोस्टर्स आणि होर्डींग्ज चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

झांबरे यांनी सर्व बॅनर्स, होर्डिंग्जसाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांत शरद झांबरे पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मतदारसंघात प्रस्थापितांविरोधात मोठा रोष दिसत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा आरोप झांबरे यांनी केला आहे. याचे 'मास्टर माईंड' लवकरच पुराव्यांनिशी समोर आणू, असे झांबरे यांनी म्हटले आहे.

मला मिळत असलेला पाठिंबा पाहून विरोधक घाबरले आहेत. यामागचे 'मास्टरमाईंड' लवकरच समोर येतील. खालच्या स्तरावरील राजकारणाला अमरावती विभागातील पदवीधर मतदारच उत्तर देतील. पोलिसांनी लवकर दोषींवर कारवाई करावी.

शरद पाटील -झांबरे, अध्यक्ष (पदवीधर युवा शक्ती असोसिएशन)

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news