हिंगोलीत दोन गटात तुंबळ हाणामारी; २० ते २५ जणांचा घरांवर हल्‍ला, १० जखमी | पुढारी

हिंगोलीत दोन गटात तुंबळ हाणामारी; २० ते २५ जणांचा घरांवर हल्‍ला, १० जखमी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दहाजण जखमी झाले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. ​​​​​आखाडा बाळापूर पोलिस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने वाद नियंत्रणात आला.

कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. त्यानंतर गावांतर्गत वादाला तोंड फुटले होते. दोन गटांमध्ये सुरू असलेल्या या वादामध्ये काही जणांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र वाद मिटला नाही. दरम्यान, बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास 20 ते 25 जणांच्या एका गटाने झोपेत असलेल्या काही व्यक्तींच्या घरावर हल्ला केला.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काठ्यांसोबतच लोखंडी रॉडचा हाणामारीसाठी सर्रास वापर करण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार राजीव जाधव, राजेश मुलगीर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, घटनास्थळावर मारहाणीने रक्ताचा सडा पडला होता. तर अनेकांच्या डोक्याला मार लागला होता.

पोलिसांनी तातडीने तीन रुग्णवाहिका बोलावून 10 जखमींना उपचारासाठी आखाडा बाळापुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या सर्वांवर उपचार करण्यात आले. मात्र पाच जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्‍यांना नांदेड येथे हलवले जात आहे. या घटनेमध्ये अनेकांच्या पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमध्ये शेख ताहेर, शेख अख्तर, शेख सद्दाम, शेख जकीर, शेख मिनाज, शेख मजलुम, शेख मुन्ना, शेख रुहान, शेख तसलीम, शेख नौसाज यांचा समावेश आहे.

दरम्यान, मारहाण करणारा गट गावातून फरार झाला असून पोलिसांनी आता स्वतंत्र पथक स्थापन करून त्यांचा शोध सुरू केला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक गावात ठाण मांडून आहेत. काही दिवसांपूर्वीच कांडली ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये दोन गटात वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान आता हाणामारीत झाल्याचे सांगितले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद याला कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button