विधान परिषदेतून : खडसेंचा वशिला | पुढारी

विधान परिषदेतून : खडसेंचा वशिला

-चंदन शिरवाळे
विधानसभेतील ‘दादा’ सदस्यांपैकी एकनाथ खडसे हे एक होते. त्यांची भाषणे नेहमीच टोकदार राहिली आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते असताना अनेक मंत्र्यांना त्यांनी घाम फोडला आहे. तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भ्रष्टाचाराचे एक प्रकरण खडसे यांनी काढले होते. पण पाटीलही हुशार निघाले होते. सभागृह पंधरा मिनिटे तहकूब झाल्याची संधी साधत त्यांनी काही कामानिमित्त दिल्लीला गेलेल्या गोपीनाथ मुंडे यांना फोन लावून खडसे यांना आवरा, अशी विनंती केली. मुंडेंनी खडसे यांना समजावल्यामुळे हर्षवर्धन पुढील अनेक वर्ष मंत्रिपद भूषवू शकले.

खडसे हे ‘दादा’ असल्यामुळे सभागृहात बोलण्यासाठी त्यांना कधी वशिला लावण्याची कधी गरज पडली नाही. परंतु आता त्यांनी पक्षीय वेस बदलली आहे. राष्ट्रवादीचे सदस्य म्हणून सध्या ते विधान परिषदेत आहेत. मंगळवारी हाफकिन संस्थेच्या कारभारावर बोट ठेवत अनेक सदस्य नाराजी व्यक्त करत होते. त्यामुळे या विषयावर बोलण्यासाठी खडसे सतत हात उंच करून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, हा विषय मांडणारे भाजपाचे सदस्य प्रवीण दटके आणि उत्तर देणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गोऱ्हे यांचे लक्ष होते. दरम्यान, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या आसनाच्या डाव्या बाजूकडे पाहिले असता, खडसे हे शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांच्याशी कुजबुज करताना आढळले. त्यामुळे हाफकिनच्या विषयावर बोलण्यासाठी खडसे हे परब यांच्याकडे वशिला लावत असावेत, असा समज झालेल्यामुळे, तुमचे सभागृहात वेगळे स्थान आहे. तुम्हाला कोणाकडे वशिला लावण्याची गरज नाही, असे उपसभापती बोलताच खडसे आणि परबही गांगरले.

राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांना हाफकिनद्वारे औषधे आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी करून दिली जातात. मध्यवर्ती संस्था असल्यामुळे तसेच एकाच वेळी मोठी खरेदी केली जात असल्याने खर्च कमी येतो. याची जाणीव सर्वांनाच आहे. तसेच कोविड काळात या संस्थेने केलेल्या कामाचा अनेक सदस्य गौरव करीत असताना भाजपाचे सदस्य प्रवीण पोटे उभे राहिले. काही महत्त्वाचे बोलायचे असेल म्हणून उपसभापतींनी त्यांना संधी दिली. मात्र, त्यांनी हाफकिनच्या विरोधातच सूर लावला. या संस्थेमुळे रुग्णालयांना औषधे आणि उपकरणे विलंबाने मिळत आहेत. रुग्णांवर उपचार करणे अवघड जात असल्यामुळे या संस्थेऐवजी खासगी संस्थांकडून औषधांची खरेदी करावी, असे मत पोटे यांनी व्यक्त केले.

मात्र, सगळे सदस्य हाफकिनचे कौतुक करत असताना आणि या संस्थेला आणखी सुविधा व अधिकार देण्याबाबत एकमत होत असताना पोटे यांनी विरोधाचा सूर लावून सभागृहातील वातावरण गढूळ केल्याचे पाहून सभापती चांगल्याच संतापल्या. रोगापेक्षा तुमचा इलाज भयंकर आहे. खाली बसा, असे निर्देश त्यांनी दिले. एखाद्या रोबोटने आदेश पाळावेत, अशी अवस्था पोटे यांची झाली.

Back to top button