नागपूर : अधिवेशन आहे की, नळावरचे भांडण – महेश एलकुंचवार

नागपूर : अधिवेशन आहे की, नळावरचे भांडण – महेश एलकुंचवार
  • गौरीशंकर घाळे

नागपूर : अधिवेशन आहे की नळावरचे भांडण, नळाचे पाणी वाहून चालले आहे, त्याकडे कुणाचे लक्षच नाही, असे ताशेरे ओढत आपण सगळ्याच क्षेत्रात २५ वर्षे खाली गेलो आहोत. त्यातून वर यायला अजून २५ वर्षे लागतील, असे चिंतन मांडत ज्येष्ठ नाटककार, लेखक महेश एलकुंचवार यांनी वर्तमानावर आसूड ओढले.

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय धुमशान सुरू आहे. याबाबत लेखक, कलावंत यांच्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याचनिमित्ताने नागपूर येथे वास्तव्यास असणाऱ्या नाटककार महेश एलकुंचवार यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांची अस्वस्थता, सामाजिक घडामोडींचे मुक्त चिंतन आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीचा ऐतिहासिक संदर्भ देत ते धांडोळा घेऊ लागतात.
आम्ही पं. जवाहरलाल नेहरूंचा काळ पाहिला, आम्ही डांगे, मधु लिमये यांचाही काळ पाहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी पाहिल्या. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा सुसंस्कृत, वैचारिक बांधिलकी, बैठक असण- रा राजकारणी पाहिला. तो काळ आज आठवला की, आपण कुठून कुठे आलो आहोत, असा प्रश्न पडतो. अशा असंख्य नोंदी भरभर मांडताना महेश एलकुंचवार मध्येच थांबतात आणि मी अधिकारी पुरुष नाही, कदाचित माझे वय ८३ झाले म्हणून हतबल, हताश म्हाताऱ्याची ही चिडचिडही असू शकते, असेही ते नमूद करतात.

धरणगावचा वतनदाराच्या कुटुंबाचा 'वाडा चिरेबंदी' काळाच्या ओघात कसा ढासळत जातो, मानवी नातेसंबंधांमध्ये कशी दही माजत जाते, याचे अजरामर भेदक वास्तववादी कलात्मक आणि अभिजात लेखन करून मराठी रंगभूमीला एका उंचीवर नेणाऱ्या, मराठीसह जगभरातील भाषांमध्ये वैचारिक आदानप्रदान करणारा नुकताचा टाटा साहित्य महोत्सवाच्या यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेला मराठीतील हा महान लेखक देशाविषयी बोलता बोलता आपल्या घरासमोरच्या रस्त्यापर्यंत येऊन ठेपतो. प्रस्तुत प्रतिनिधीसोबत या गप्पांमध्ये सहभागी असलेल्या त्यांच्या मित्राला उद्देशून म्हणतात की, हा रस्ता तुमची महापालिका झाडत नाही, तो माझा मीच झाडतो. पलीकडे जो नाला दिसतो त्याला काही वर्षांपूर्वी १८०० कोटी मंजूर झाले. त्याच्या भूमिपूजनाला मला बोलावले, आता नाल्याचे
चित्र बदलणार, तुम्ही या, असे आशावादी चित्र मांडले गेले. मी गेलो नाही, नालाही बदलला नाही. आता पुन्हा अलीकडे बातमी कळली की, त्याच नाल्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने पुन्हा १८०० कोटी मंजूर केले आहेत. मराठीतील हा लेखक खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर चर्चिला गेला आहे. मात्र, त्याच्या भोवतालचे जग अंगणापासून संसदेपर्यंत त्याला अस्वस्थ करणारे आहे. भ्रष्टाचारावर मी बोलावे का, कारण भूतकाळात मीच कधीतरी कळत-नकळत हातभार लावला असेन, तर मला बोलण्याचा नैतिक अधिकार काय, असा थेट प्रश्न ते विचारतात.

बाहेरून साफ करून काहीच सुधारले जाणार नाही. साफ करायचे असेल तर आतूनच साफसफाई करावी लागेल, असे सांगत ते तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या थेअरीवर आपण येऊन ठेपतात. पण, आपल्याला आजतरी ते समजून घ्यायचे आहे का, आपल्याला आतून बदलायचे आहे का, याचे उत्तर जर हो असेल तर प्रत्येकाला आतून बदलावे लागेल. तरच, समाज हळूहळू बदलत जाईल. आपली ती तयारी नाही. आपण एक- दोन नव्हे, तर सर्वच क्षेत्रांत २५ वर्षे खाली गेलो आहोत. यातून वर यायला अजून २५ वर्षे लागतील. मी आशावादी आहे. तरुण पिढीकडे मी आशेने पाहतो आहे, असा आशावादी सूर ते लावतात. म्हणून मग नेमके काय केले पाहिजे, असा प्रश्न केल्यावर मात्र ते म्हणाले, माहीत नाही. पण, त्यावेळी त्यांनी केलेल्या स्मितहास्यात लेखकाच्या अस्वस्थ डायरीची पाने आपणास उलघडता येऊ शकतात.

खरेतर गप्पांची सुरुवात प्रस्तुत प्रतिनिधी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी आला आहे, अशी ओळख करून देण्याच्या मुद्दयाने झाली. यावर, अधिवेशनात काय घडतेय, लोकांचे प्रश्न सुटतायत का, रोज भांडणे तर सुरू आहेत. मला तर ही नळावरच्या भांडणांसारखी भांडणे वाटतात. दिशा सालियन प्रकरणात आता काय पुन्हा चौकशी होणार, दोषींवर कारवाई होणार का, म्हणजे नळाच्या पाण्यासारखे जनतेचे प्रश्न वाहून जात आहेत, असा सयंत संताप व्यक्त करतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news