विधान परिषदेतून : भावकीकडेही ध्यान द्या!

विधान परिषदेतून : भावकीकडेही ध्यान द्या!
Published on
Updated on

चंदन शिरवाळे : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात भावकीला खूपच महत्त्व असते. भावकीला नाराज करून जमत नाही, असे काहींचे म्हणणे असते. तर काहीजण भलतेच दचकून असतात. शुक्रवारी हा प्रसंग भाजपाचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावरच आला. खरं तर विरोधकांना घालून पाडून बोलण्यात तरबेज असलेल्या पडळकरांवर दचकण्यासारखा प्रसंग आला हे कोणालाही पटणार नाही. पण आला. भाजपाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला होता.

करमाळा तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पाला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या भागातील शेतकऱ्यांना अद्याप पर्यायी जमीनी दिल्या नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या भावनिक मुद्दयावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची परवानगी घेऊन पडळकर बोलायला उभे राहिले. त्यांनीही एक- दोन मोठ्या प्रकल्पांची नावे घेत सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी घरांसाठी जागा दिल्याचे सांगितले. पण थोरल्या भावाला एका गावात, धाकल्याला दुसऱ्या गावात. कोणी वतनावर रहात असेल तर त्याला तिसऱ्या गावात जमिनी दिल्या आहेत. जमिनी एका तालुक्यात न देता वेगवेगळ्या जिल्ह्यात दिल्यामुळे सगळा घोळ झाला आहे. सरकारने असे करायला नको होते, असे पडळकरांचे म्हणणे होते.

या वाटपामुळे सख्ख्या भावांच्या ताटातुटी झाल्या आहेत. सुख-दु:खालाही त्यांना येणे शक्य होत नाही. इतकेच नाहीतर सरकारने भावकीचीही ताटातूट केली आहे. धरणग्रस्त हे सर्व हिंदू आहेत. त्यांना सामूहिक सण उत्सव साजरा करता येत नाहीत. इतकेच नाहीतर दुःखद प्रसंगीही त्यांना वेळेवर जाता येत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना यापुढे वेगवेगळ्या जिल्ह्यात जमिनी आणि घरे देऊ नयेत. सरकारने जरा भावकीचाही विचार करावा, ही नवी अट पडळकरांनी घालताच सभागृह खळखळ हसले. मुद्दा हसण्याचा असला तरी तो रास्तच होता. कारण मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यावर लगेच मान हलवली. आपल्या खात्याचा एखादा प्रश्न किंवा लक्षवेधी असेल तर संबधित खात्याचे मंत्री काळजीत पडतात. भ्रष्टाचारविषयक बाब असेल तर काळजात धस्स होते. अशावेळी संबंधित खात्याचे मंत्री आपल्या मदतीसाठी विभागाच्या अधिकाऱ्यांचा फौजफाटा लॉबीत बसवतात. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी लावली होती. विरोधी पक्षनेत्याने लक्षवेधी लावल्यास मंत्री दचकतात. पण या खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण भलतेच खुश होते.
दानवे यांच्या प्रश्नांची उत्तरे चव्हाण यांनी तयारच ठेवली होती. आनंदाचा शिधा वाटपात भ्रष्टाचार झाला असल्याचे अस्त्र दानवे यांनी फेकताच, दिवाळीतील हा शिधा ९७ टक्के वाटप झाला असून जेथे वाटप झाला नसेल तेथे उर्वरीत शिधा वाटपाचे काम चालू असल्याचे चव्हाण ऊर भरून सांगत होते. तर भ्रष्टाचार झालाच असल्याचे दानवे ठामपणे सांगत होते. प्रश्न आणि आरोपांच्या तोफगोळ्याने लक्षवेधी पुढे – पुढे सरकत होती.

अखेरीस चव्हाण यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्याकडे पाहीले. त्यांना काय म्हणायचे आहे हे गोऱ्हे यांनी ओळखले आणि म्हणाल्या, तुमच्या उत्तराने त्यांना आनंद होत नाही त्याला मी तरी काय करू. जनतेला आनंद कसा होईल, ते बघा आणि उर्वरीत शिधा वाटप करा. उपसभापतींच्या या आदेशाने चव्हाण यांना रोशन सातारकर यांचे आनंद झाला माझ्या मनाला, हे गीत नक्कीच आठवले असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news