दिशा सॅलियनच्या मृत्यूच्या दिवशी रुग्णालयात होतो; आदित्य ठाकरे यांनी अखेर मौन सोडले | पुढारी

दिशा सॅलियनच्या मृत्यूच्या दिवशी रुग्णालयात होतो; आदित्य ठाकरे यांनी अखेर मौन सोडले

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी अखेर मौन सोडले. ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला, त्या दिवशी आपण रुग्णालयात होतो. आपल्या आजोबांवर उपचार सुरू होते. त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.

दिशा सालियनची आत्महत्या नसून तिची हत्या झाली असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. विधानसभेत नितेश राणे यांनी दिशा सालियनचा मृत्यू झाला त्या पार्टीत कोण होते, सीसीटीव्हीचे फुटेज का गायब आहेत, व्हिजिटर बुकमधील पाने का फाडली गेली आहेत, असे प्रश्न उपस्थित करत नितेश राणे यांनी चौकशीची मागणी केली. तर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ४४ वेळा फोन केलेली ‘एयू’ नावाची व्यक्ती कोण याची चौकशी करण्याची मागणी केली. त्याशिवाय, दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी गोगावले यांनी सभागृहात केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीच्या माध्यमातून दिशाच्या मृत्यूची चौकशी करण्याचा निर्णय घोषित केला. या सर्व प्रकरणात आतापर्यंत गप्प राहिलेल्या आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी अखेर मौन सोडले. आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.आम्ही सभागृहात मुख्यमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढला. सरकारला विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकायचे नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. आमच्यावर कितीही चौकशी लावली तरी आम्ही डगमगणार नाही, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांची नार्को चाचणी करावी; अभिनेता सुशांतच्या वडिलांची मागणी

नवी दिल्ली : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नार्को चाचणी करावी. तरच सत्य समोर येईल, अशी मागणी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांनी केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचेही त्यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील आताच्या सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून हे खरे तर खूप आधी करायला हवे होते. मात्र, त्यावेळी राज्यात वेगळे सरकार होते. आधीच्या सरकारमधील लोक त्यात अडकल्याने या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नाही. दिशा सालियन प्रकरणासंबंधी बातम्यांमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव समोर येत असल्याचे मी पाहिले आहे. त्यांची नार्को चाचणी झाली पाहिजे. एसआयटीच्या तपासात सत्य समोर येईल, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

Back to top button