विधानभवनातून : विधानसभेतही टार्गेट आदित्य ठाकरे ! | पुढारी

विधानभवनातून : विधानसभेतही टार्गेट आदित्य ठाकरे !

• दिलीप सपाटे

संसदेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांना टार्गेट करीत सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती आणि दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. ए यु म्हणजे दुसरं काही नव्हे तर आदित्य उद्धव हे बिहार पोलिसांनी सांगितल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी सभागृहात सांगून खळबळ उडवून दिली. तर दुसरीकडे विधानसभेतही आदित्य ठाकरे हेच सत्ताधारी आमदारांच्या टार्गेटवर असल्याचे दिसून आले.

अधिवेशन सुरू झाल्यापासून गेली तीन दिवस आदित्य ठाकरे यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जेंव्हा जेंव्हा आदित्य ठाकरे हे बोलण्यास उभे रहात आहेत तेंव्हा तेंव्हा त्यांना हे आमदार विरोध करताना दिसत आहेत. अगदी एकेरी भाषेत त्यांना खाली बस म्हणून हे आमदार अंगावर येत असल्याचे चित्र आहे. पहिल्याच दिवशी एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक राहिलेल्या मंत्री गुलाबराव पाटील आणि शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांनी टीका करताच तुमचे खूप झाले, आता गप्प बसा असे सुनावले. त्यानंतर आमदारही आक्रमक झाले. बुधवारी मात्र संसदेत आदित्य ठाकरे निशाण्यावर आले असताना विधानसभेतही भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या निशाण्यावर दिसले.

आमदार राम सातपुते हे मुंबईच्या मुद्यावर आदित्य ठाकरे यांच्या अंगावरच जायचे उरले होते. पुरवणी मागण्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याचे अंडे देणारी कोंबडी केल्याने सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते. त्यावेळी भुजबळ यांना साथ देण्यासाठी उठलेल्या आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदारांनी हल्लाबोल केला. त्यांना एकेरी शब्दात ये खाली बस, खाली बस म्हणत होते. आमदार मनीषा चौधरी यांनी तुम्ही पंचवीस वर्षात मुंबई लुटली असा आरोप केला. त्यानंतर राम सातपुते हे तर आदित्य ठाकरे यांच्या दिशेने जाऊन जोर जोरात हातवारे करीत आणि त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना सुनावत होते. मात्र आदित्य ठाकरे यांच्या मदतीला त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आले नाहीत. ते गप्प बसून होते. मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांच्यामागे उभे राहिल्याचे चित्र होते. मात्र आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार असे तुटून पडल्यावर त्यांना त्यांची साथ मिळाली नाही .

ठाकरे गटाच्या शिवसेनेची सभागृहात मर्यादित ताकद असल्याने त्यांचे आमदार प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. गटनेते अजय चौधरी हे उठून उभे राहिले. बाकी आमदारही गप्पच होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना गप्प बसणेच भाग पडले.

Back to top button