विधान भवनातील कार्यालयावरही शिंदे गटाचाच दावा! | पुढारी

विधान भवनातील कार्यालयावरही शिंदे गटाचाच दावा!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांना नामोहरम करण्याची रणनीती सत्तारूढ भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीने आखली आहे. आता थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाच लक्ष्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा एकदा शिंदे सरकारची ‘खोके’ सरकार अशी संभावना केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराचे खोके एकावर एक रचल्यास ‘शिखरा’पर्यंत जातील आणि त्याकडे पाहताना दमछाक होईल, असे विधान केले. शिखर बँकेतील भ्रष्टाचाराकडे याद्वारे शिंदे यांनी लक्ष वेधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याशिवाय लवासाचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळेच अधिवेशनात शरद पवारांसह अजित पवारांना टार्गेट केले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनीही सतत शिंदे सरकारवर खोके सरकार असल्याची टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडूनही तशीच भाषा होत आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना थेट लक्ष्य करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.
दरम्यान, विधान भवनाच्या आवारातील पक्ष कार्यालय शिंदे गटाच्याच ताब्यात राहणार आहे. ठाकरे गटाला आमदारांच्या संख्येनुसार नवे कार्यालय दिले जाईल, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने दै. ‘पुढारी’ला सांगितले.

Back to top button