चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : आज (दि.१४) पहाटेच्या सुमारास गावाशेजारी शौचास गेलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीवर व जंगलात शेळ्या राखण्याकरीता गेलेल्या एका ५० वर्षीय गुराख्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही ठार झाल्याची घटना बुधवारी (दि .१४) सकाळी सावली तालुक्यातील रूद्रापूर व मुल तालुक्यातील कांतापेठ शेतशिवारात घडली. बाबुराव बुधाजी कांबळे (वय ५५ रा. रुद्रापूर) व देवराव सोपनकर असे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोघांचे नाव आहे. दोन्ही ठिकाणच्या वाघांच्या घटनांनी चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत रुद्रापूर निवासी बाबुराव बुद्धाजी कांबळे (वय ६५) हा व्यक्ती पहाटेच्या सुमारास गावालगत शौचास गेला होता. गावाशेजारीच जंगल असल्याने या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला चढविला. मानेला जबड्यात पकडून जंगलाच्या दिशेने घेऊन जात असताना ही घटना काही व्यक्तींना लक्षात आली. वाघाने जंगलात त्या व्यक्तीला फरफटत नेल्याने त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. वनविभागाने मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरीता सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेने रूद्रापूर येथील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहे. सावली तालुक्यातील आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

दुसरी घटना मूल तालुक्यातील कांतोपठ शेतशिवारात आज बुधवारी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास घडली. मृतक देवराव सोपनकर हा नेहमी प्रमाणे गावालगतच्या जंगलात सकाळी शेळ्या घेऊन गेला होता. सायंकाळी घरी शेळ्या परत आल्या. परंतु, गुराखी परत आला नाही. त्यामुळे वडील घरी परत न आल्याने काही नागरिकांच्या सहकार्याने जंगलात शोध घेण्यात आला. गुराख्यावर वाघाने हल्ला करून सुमारे दीड किमी अंतरावर फरफटत नेल्याचे निरीक्षणांती लक्षात आले. मृतकाचे पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करून उत्तरीय तपासणीला पाठविण्यात आला.

हेही वाचलंत का?

Back to top button