यवतमाळ : माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा | पुढारी

यवतमाळ : माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या भावावरून २०१३ मध्ये हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. माजी आमदार राजू नारायण तोडसाम यांच्यासह सहा जणांना  केळापूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रदीप नाईकवाड यांनी सोमवारी (दि.१२) तीन वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

पांढरकवडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २९ नोव्हेंबर २०१३ रोजी कापसाचा लिलाव सुरू होता. यावेळी माजी आमदार राजू तोडसाम यांचेसह कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी व्यापारी भाव बरोबर देत नसल्याचा तसेच काट्यात हेराफेरी होत असल्याचा आरोप करीत कापसाचा लिलाव बंद पाडला. त्यानंतर ते लाठ्याकाठ्या घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शिरले व इमारतीची तोडफोड केली. तसेच इमारतीला आग लावली. यात ३ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान झाले होते. तर १ लाख १२ हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेले होते. घटनेची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, पांढरकवडा पोलीस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राखी गेडाम यांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासमोर चालले. परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी माजी आमदार राजू नारायण तोडसाम यांच्यासह सहा जणांना तीन वर्षे सक्तमजुरी व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून ॲड. चंद्रकांत डहाके व ॲड. प्रशांत मानकर यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ॲड. गणेश धात्रक यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का?

Back to top button