समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात गेमचेंजर ठरेल : देवेंद्र फडणवीस | पुढारी

समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात गेमचेंजर ठरेल : देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  विदर्भच नव्हे तर राज्याच्या विकासात गेमचेंजर ठरणारा समृद्धीसारखा महामार्ग खरोखरच अस्तित्वात येऊ शकतो, याबाबत बहुतेक सर्वांनाच शंका होती. मात्र, एकाच व्यक्तीचा याबाबत माझ्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास होता आणि त्याने माझ्या या संकल्पनेवर कामही सुरू केले, ती व्यक्ती म्हणजे त्यावेळचे माझ्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आताचे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होत. शिंदे यांचे असे कौतुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमक्ष केल्याने शिंदे समर्थक सुखावलेच. यासह फडणवीस यांच्या या वक्तव्याने शिंदे व फडणवीस या दोघांचे ट्युनिंग जोरदार आहे, याची प्रचितीही आली. शिंदे हे पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून या महामार्गासाठी माझ्यासोबत काम करीत होते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

आम्ही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, पत्रकार, संपादकांना एकत्र आणून त्यांच्यासमोर समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली आणि त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर आम्ही या कामाला सुरुवात केली. सर्वात आधी भूमी अधिग्रहणाचा महत्त्वाचा विषय होता. त्यासाठी खूप पैशांची गरज होती. मात्र कोणतीही बँक पैसा देण्यास तयार नव्हती.

महाराष्ट्र सरकारची काही अपत्ये अशी आहेत, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यात एमएमआरडीए, एमआयडीसी, सिडको या अपत्यांचा समावेश आहे. आम्ही त्यांना म्हटले की, सर्व पैसा मुंबईत कमावून मुंबईतच गुंतवणूक करू नका. आता त्या पैशाची विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही गुंतवणूक करा. आम्ही त्यांच्याकडून पैसे उधार घेतले आणि सर्व जमिनींचे अधिग्रहण केवळ 9 महिन्यांतच केले. अधिग्रहणाला काहींचा विरोध होता. काहींना विश्वास वाटत नव्हता. त्यामुळे आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः करारांवर स्वाक्षर्‍या केल्या, असा उल्लेख फडणवीसांनी यावेळी आवर्जून केला.

Back to top button