चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार | पुढारी

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : धान बांधणीचे काम सुरू असल्याने शेतात गेलेल्या एका ४७ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करत ठार केल्याची घटना मंगळवारी (६ डिसेंबर) घडली. कैलास लक्ष्मण गेडेकर असे त्‍यांचे नाव आहे. बुधवारी ही घटना उघडकीस आल्‍यानंतर सावली तालुक्यात प्रचंड दहशत पसरली आहे.

उपवन क्षेत्र व्याहाड (खुर्द) परिसरातील निलसनी पेठगाव येथील कक्ष क्रं. २०१ मध्ये कैलास गेडेकर यांचे शेत आहे. याच परिसराला झुडपी जंगल लागून आहे. या जंगलात वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. त्यामुळे शेतकरी , शेतमजूर या परिसरात जीव मुठीत घेऊन मशागतीचे कामे करीत असतात. सध्या धान कापणी झाल्याने धानाचे भारे बांधण्याचे काम सुरू आहे. बुधवारी कैलास गेडेकर हा शेतकरी शेतात गेला होता. उशीर होऊनही तो घरी परत न आल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली. परंतु, शोध लागला नाही.

आज पुन्हा त्याचा शोध घेण्यात आला असता शेता लगतच्या जंगलात काही ठिकाणी फरफरट नेल्याच्या खुणा आढळून आल्या. त्या दिशेने त्याची शोध मोहीम राबविली असता, काही अंतरावर कैलास गेडेकर यांचा  मृतदेह आढळून आला. वाघाने त्‍यांचे केवळ धड शिल्लक ठवले होते. या घटनेची माहिती वनविभागला देण्यात आल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करुन उच्च स्तरीय तपासणी पाठविण्यात आला आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button