अमरावती : अत्याचार पिडित अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व; गुन्हा दाखल | पुढारी

अमरावती : अत्याचार पिडित अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व; गुन्हा दाखल

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याची घटना वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पीडितीने एका मुलीला जन्म दिला. ही धक्कादायक घटना वरूड ठाण्याच्या हद्दीत शनिवार (दि.३) उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी रितेश जगुशी सिरसम (वय २०,रा. कोठिया बोरदई, मध्यप्रदेश) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

पीडित १५ वर्षीय मुलगी गतवर्षी मजुरीच्या कामासाठी मध्यप्रदेशातून वरूड तालुक्यात आली होती. वरूड तालुक्यातील एका शिवारात काम करीत असताना तिची ओळख रितेश याच्याशी झाली. काही दिवसांनी ते दोघे शेतातील एका झोपडीमध्ये एकत्र राहू लागले. या कालावधीत त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये पीडित मुलगी आपल्या मध्यप्रदेशमधील घरी परत गेली. त्यावेळी तिने सदर प्रकाराबाबत घरी कुणाला काहीही सांगितले नाही.

दरम्यान, प्रसुतीवेदना सुरू झाल्याने कुटुंबीयांनी तिला मध्यप्रदेशातील एका रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. तत्पूर्वी, संबंधित रुग्णालय प्रशासनाने पीडित मुलीच्या कागदपत्रांची तपासणी केली. ती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी याबाबत बैतुल जिल्ह्यातील आमला पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची फिर्याद नोंदविले. यावेळी तिने आपबिती कथन केली. आमला पोलिसांनी या प्रकरणात आरोपी रितेशविरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद केली. परंतु, सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे वरूड तालुक्यात होते. त्यामुळे सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी वरूड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

हेही वाचलंत का?

Back to top button