चंद्रपूर : ताडोबात पट्टेदार वाघाच्या ४ बछड्यांचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : ताडोबात पट्टेदार वाघाच्या ४ बछड्यांचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी ताडोबा व्याघ्र अभयारण्यात दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज ( दि. ३) पुन्हा ४ बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने ताडोबा प्रशासनात खळबळ उडाली आहे. एखाद्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याने बछड्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये एका बछड्याचा समावेश होता. एका वाघाचा मृत्यू महिनाभरापूर्वीच झाल्याचे वनविभागाने सांगितले होते. ती घटना ताजी असतानाच आज (शनिवार) सकाळी चार बछड्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. ताडोबाच्या बफर झोनमधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलात पट्टेदार वाघांचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आले. मोठ्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

याबाबत वन विभागाने अद्यापपर्यंत अधिकृत माहिती दिलेली नाही. सूत्रांनुसार वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना चार बछडे जंगलात मृतावस्थेत आढळून आले. या संदर्भात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांनी उपस्थितीत चारही बछड्याचा पंचनामा करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button