अमरावती : १० लाखात विकल्या चोरीच्या अॅल्युमिनियम प्लेटा, आरोपींचा शोध सुरू | पुढारी

अमरावती : १० लाखात विकल्या चोरीच्या अॅल्युमिनियम प्लेटा, आरोपींचा शोध सुरू

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : अहमदाबादहून छत्तीसगड जाणाऱ्या ट्रकमधून ६७ लाख रुपये किमंतीच्या २९ मेट्रिक टन अॅल्युमिनियम प्लेट्स चालक व क्लिनरने संगमनत करून दहा लाख रुपयात विकल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे मोर्शी पोलिसांकडून चालक रोशन गोलाराम सचदेव आणि क्लिनरचा शोध सुरू आहे. याप्रकरणात चोरीचा मुद्देमाल विकत घेणारा आरोपी अलीम खान सलीम खान ( वय ३८, रा. पिंपळपुरा, मोर्शी) आणि त्याचा साथीदार अझहर खान हाफिज खान (वय ३८, रा. गुलिस्तानगर लालखडी) यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.

ट्रक चालक रोशन सचदेव हा विपिन वीरचंद जैन यांच्या मालकीच्या ६७ लाखांच्या २९ मेट्रिक टन अॅल्युमिनियम प्लेट्स घेऊन जात होता. १६ नोव्हेंबर रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथून छत्तीसगडमधील भिलाईकडे तो निघाला होता. मात्र, मध्येच त्याने अॅल्युमिनियम प्लेटा विकल्या. चालक रोशन सचदेव याने यापूर्वीही अशाच प्रकारची चोरी केली होती. तसेच ट्रकमध्ये माल भरून दुसऱ्याला विकला आहे. त्यामुळे त्याच्याविरुध्द यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. रोशन सचदेव याच्यावरही शस्त्र अधिनियमतंर्गत गुन्हा देखील दाखल आहे.

ट्रकचालक रोशन सचदेव याने अमरावती येथील एका व्यक्तीला लाखोंचे अॅल्युमिनियम विकण्यासाठी संपर्क साधला. ज्याने त्याला अलीम खान सलीम खान हे नाव सांगितले. त्यामुळे रोशनने ट्रक तिवसाकडे नेण्याऐवजी मोर्शीकडे वळविला. येथे ६७ लाखांचा अॅल्युमिनिअमचा सौदा अवघ्या १० लाखांमध्ये केला. या डीलमध्ये मध्यस्थाने ३ लाख रुपये, तर चालक रोशन ७ लाख रुपये घेऊन गेला असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. पोलीस चालक रोशन सचदेव आणि क्लिनरचा शोध घेत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button