कुंभकोणींना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात नेमले; देवेंद्र फडणवीस यांची माहिती | पुढारी

कुंभकोणींना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात नेमले; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी संदर्भातला प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. कारण कुंभकोणी यांना मुख्यमंत्र्यांनी नेमले आहे. ते मागील सरकारचे कंटिन्यू झालेले अॅडव्होकेट जनरल नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या अधिकारात नेमले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाधिवक्ता आशुताेष कुंभकाेणी यांच्यामुळेच आघाडी सरकार प्रत्येक खटला हारीत असल्याचा संशय व्यक्त केला होता. सरकार बदलले की महाधिवक्ता बदलतात. पण, मागील सरकारमध्ये महाधिवक्ता असलेले कुंभकोणी याही सरकारमध्ये कायम असल्याची टीका पटोले यांनी केली होती. त्यावर बोलताना फडणवीस यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे, असा टोला हाणला.

वीज बील संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, सरकारला थकित वीज बिलाची सावकारी वसुली कारायची आहे. म्हणून सरकारकडून बाऊ निर्माण केला जात आहे. कोरोनामुळे एकीकडे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी सरकाराला त्यांच्याकडून जबरदस्ती वसूली करायची असल्याने हे नाटक सुरू असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. ऊर्जा मंत्र्यांनी केलेल्या प्रेझेन्टेशनमधून त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली हे स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी हाणला.

आता निवडणुका लागल्यामुळे आम्ही त्याला सामोरं जाऊ. मात्र सरकार जे बोलते ते कृतीत दिसत नाही हे यातून स्पष्ट झाले आहे, अशी टीका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असलेल्या निवडणूकां संदर्भात केली. प्रवीण दरेकर बोलीभाषेत असे बोललेे, हे चंद्रकांत दादा पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढणे योग्य नाही. सध्या एनसीपीकडे कुठले मुद्दे नसल्यामुळे असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फडणवीस म्हणाले.

Back to top button