Buldhana : ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिका-यांवर चार अज्ञाताचा हल्ला; दोघेजण गंभीर जखमी | पुढारी

Buldhana : ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिका-यांवर चार अज्ञाताचा हल्ला; दोघेजण गंभीर जखमी

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा :  ठाकरे गटाच्या दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची दुचाकी अडवून, कारने पाठलाग करत अज्ञातांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. मंगळवारी सायंकाळी बुलढाणा-मोताळा मार्गावर घडली ही घटना घडली. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Buldhana)

याबाबत अधिक माहिती अशी की, ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चिखली येथे २६ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा  आयोजित केलेली आहे. या सभेच्या नियोजनासाठी ठाकरे गट शिवसेना पदाधिका-यांची बैठक बुलढाणा शहरातील जनशिक्षण संस्थान या ठिकाणी झाली. ही बैठक पार पडल्यानंतर ठाकरे गट-शिवसेनेचे मोताळा तालुकाप्रमुख अनंता दिवाणे (वय ४५, रा. शिरवा ता.मोताळा) व युवासेना जिल्हा उपप्रमुख शुभम घोंगटे (वय २५) हे दोन पदाधिकारी आपल्या दुचाकीने मोताळ्याकडे निघाले होते. दरम्यान बुलढाण्याहून चारचाकीने पाठलाग करत असलेल्या अज्ञात चौघांनी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. चारही हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधलेले असल्याने त्यांना ओळखता आले नाही. (Buldhana)

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेले दोनही पदाधिकारी हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी जवळच्या शेताकडे धावले. त्यानंतर हल्लेखोर त्यांच्या कारसह पसार झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दिवाणे व घोंगटे या दोन्ही शिवसेना पदाधिकाऱ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची माहिती समजताच रूग्णालयाच्या परिसरात ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले.

हेही वाचा

Back to top button