पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगावचा चौक देतोय अपघाताला निमंत्रण | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगावचा चौक देतोय अपघाताला निमंत्रण

खोर, पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव (ता. दौंड) येथील चौक अपघाताला निमंत्रण देत आहे. या चौकात उड्डाणपूल उभारावा, या कित्येक वर्षांपासूनच्या भांडगावकरांच्या मागणीला कोणीच दाद देत नसल्याचे चित्र सध्या आहे. भांडगाव येथे महामार्गावर दोन चौक आहेत. एक रस्ता खोरकडे, तर दुसरा खुटबावकडे जातो आहे. या दोन्ही चौकांमध्ये वाहनचालकांबरोबर पायी प्रवाशांची मोठी रहदारी असते. कित्येकदा या चौकामध्ये अपघात होऊन अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र, गावच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे गावाचा उड्डाणपूल झाला नसल्याचे गावकरी सांगत आहेत.

या चौकामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या चौकात उड्डाणपुलासाठी ग्रामस्थांनी अनेकदा रस्त्यावर आंदोलने केली आहेत. अनेकदा खासदार, आमदार यांना याबाबतीत पत्रव्यवहार देखील केला गेला आहे. मात्र, हा तिढा कधी सुटला जाणार आणि भांडगावकर अपघातमुक्त कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पुढील आराखड्यात होणार्‍या रस्ताविस्तारीकरणात येथील उड्डाणपूल घेतल्याचे गावकर्‍यांना सांगितले आहे.

जागाही वादात अडकवली

या भागातील शेतकर्‍यांनी महामार्ग करण्यात आला त्या वेळी जमिनीला चांगला दर मिळावा म्हणून आंदोलने केली. मात्र, प्रशासनाने याकडे लक्ष न देता ही जागा वादाच्या भोवर्‍यात अडकवून ठेवली आहे. आज ही जागा दोन्ही रस्त्यांच्या मधोमध पडून आहे. आता अपघातप्रवण क्षेत्राच्या या चौकाला कधी चांगले दिवस येणार आणि येथील उड्डाणपुलाचा विषय मार्गी लागेल, हेच पाहणे महत्त्वपूर्ण असणार असून, भांडगावकर ग्रामस्थांना व प्रवाशांना कधी न्याय मिळणार, हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण असणार आहे.

Back to top button