Wardha River : वर्धा नदीत ११ जण बुडाले, ३ मृतदेह सापडले | पुढारी

Wardha River : वर्धा नदीत ११ जण बुडाले, ३ मृतदेह सापडले

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : Wardha River : दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईकांसह एकाच कुटुंबातील ११ जणांचा नाव उलटल्याने बुडून मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यच्या वरुड तालुक्यातील झुंज येथे ही घटना मंगळवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ‌‌

मृतांमध्ये महिला तसेच लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे गाडेगाव सह तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत तीन मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले. उर्वरीत मृतदेह काढण्यासाठी प्रशासनाने अमरावती येथून रेस्क्यू पथक बोलावले असून शोध मोहीम सुरू आहे.

घटनेची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच नागरीकांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी बघ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी होती. घटनेची माहीती जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना देण्यात आली आहे. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, वरूडचे प्रभारी तहसीलदार घोडेस्वार घटनास्थळावर दाखल झाले आहे.

ही घटना बेनोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे सर्वप्रथम बेनोडा पोलीस प्रशासन घटनास्थळावर दाखल झाले. तोपर्यंत प्रशासनाचा कुठलाही अधिकारी घटनास्थळावर दाखल झाला नसल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.

तिघांचे मृतदेह सापडले

नारायण गोमाजी मटरे (वय ४५, रा. वाडेगाव), वंशिका प्रदीप शिवणकर (२, रा. तिवसाघाट), किरण विजय खंडाळे (२८, रा. लोणी) या तिघांचे मृतदेह सापडले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरूडच्या ग्रामिण रूग्णालयात पाठविण्यात आले असून तिघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन डॉ. प्रमोद पोतदार यांनी केले.

अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले असल्याचे पोलीसांनी सांगीतले. तर उर्वरीत मृतांमध्ये अश्विनी अमर खंडाळे (२५, रा. तारासावंगा), वृषाली अतुल वाघमारे (१९, रा. तारासावंगा), अतुल गणेश वाघमारे (२५, रा. तारासावंगा), कु निशा नारायण मटरे (२२, रा. गाडेगाव), कु. आदिती सुखदेवराव खंडाळे (१३, रा. तारासावंगा), कु. मोहीनी सुखदेव खंडाळे (११, रा. तारासावंगा), पियुष तुळशीदास मटरे (८, रा. गाडेगाव), पूणम प्रदीप शिवणकर (२६, रा. तिवसाघााट) यांचा समावेश आहे. नावेमध्ये एकूण १३ जण बसले होते. त्यापैकी शाम मनोहर मटरे (२५) व कुमार उके (३५) हे (दोघेही रा. गाडेगाव) बचावले आहे.

धबधबा पाहण्यासाठी गेले होते नावेने

वरुड तालुक्यातील गाडेगाव येथील रवी मटरे (वय ३०) यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाल्याने यांच्या दशक्रियेसाठी पाहुणे बाहेर गावाहून आले होते. सोमवारी दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास झुंजचा धबधबा पाहण्यासाठी महीला व लहान मुलांना घेवून गेले होते. त्यावेळी झुंजचा धबधबा वाहत असताना मृतकांना नावेत बसण्याचा मोह आवरेना. परंतु नावकरी नसल्यामुळे नावेत बसावे तरी कसे याची चर्चा सुरू होती. मृतक नारायण मटरे यांनी नाव काढून कुटुंबातील सदस्यांना नावेत बसविले आणि नाव चालवायला सुरूवात केली. अशातच नाव धबधब्याच्या कडेला जावून भिडल्यामुळे ती पलटी झाली. त्यामुळे नावेसह मटरे कुटुंब त्या धबधब्यात बुडाले.

नाव करी नसल्याने झाला घात

पाण्यामध्ये नाव चालवण्याचे कसं केवड नाव कार्याला असते. मात्र या घटनेच्या वेळी नावेत नाव करी नसल्याने घात झाला. घटनेची माहीती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच नागरीकांनी घटनास्थळावर धाव घेतली. तोपर्यंत मृतदेह धबधब्यातच अडकून राहीले. काही वेळातच बेनोडा शहीद पोलीस घटनास्थळावर दाखल होवून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना तिघांचे मृतदेह काढण्यात यश आले. पण उर्वरीत मृतदेह काढण्यासाठी अमरावतीवरून रेस्कु टिमला पाचारण करण्यात अाले. रेस्कु टिम घटनास्थळावर दाखल होताच शोधकार्य सुरू झाले परंतु पावसाचा जोर असल्यामुळे काही काळ शोधकार्य करतांना अडथळा निर्माण झाला. बातमी लिहीस्तोवर रेस्कुटीमचे शोधकार्य सुरूच होते.

Back to top button