नागपूर : बाळाचे अपहरण करून अडीच लाखांना विकण्याचा प्रयत्न, चौघे पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

नागपूर : बाळाचे अपहरण करून अडीच लाखांना विकण्याचा प्रयत्न, चौघे पोलिसांच्या ताब्यात

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आठ महिन्याचा चिमुकला अचानक बेपत्ता झाला. चॉकलेटच्या बहाण्याने शेजारीच राहणाऱ्या युवकाने या चिमुकल्याला घेऊन पत्नीसह पलायन केले अन् अडीच लाखात एका दाम्पत्याला विकून टाकले. मात्र, पोलिसांनी ५ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावत बाळाची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सूटका केली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

याबाबत बाळाच्या वडिलांनी रात्री कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत शेजाऱ्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासचक्र वेगात फिरविली आणि केवळ पाच तासांमध्ये या बाळाच्या अपहरणाचा छडा लावला. लहान मूल नजरेत भरले की जवळपास भाड्याने खोली घ्यायची. या मुलांसाठी कुटुंबियांशी जवळीक साधायची आणि शेवटी या निरागस चिमुकल्यास विकून पैसे कमवायचे हा गोरखधंदा असलेल्या टोळीचा यानिमित्ताने नागपुरात पर्दाफाश झाला आहे.

सातपैकी चार आरोपींना आतापर्यंत अटक केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. मुलबाळ नसल्याने आपण हे बाळ घेतल्याचे या दाम्पत्याने सांगितले. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून बाळाला ताब्यात घेत आईच्या स्वाधीन केले.

जितेंद्र निशाद असे या आठ महिन्यांच्या अपहृत बाळाचे नाव आहे. त्याचे आई-वडील कळमना हद्दीत राहतात. शेजाऱ्यानेच त्यांच्या घरून या मुलाचे अपहरण केले. हा मुलगा दुपारपासून घरी नसल्याने आई -वडीलांनी दिवसभर मित्र, नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र, मुलगा आढळून न आल्याने प्रकरण पोलिसात गेले.

हेही वाचलंत का?

Back to top button