यवतमाळ : शस्त्राच्या धाकावर ३२ लाखांच्या टॉवरच्या तारा पळवल्या | पुढारी

यवतमाळ : शस्त्राच्या धाकावर ३२ लाखांच्या टॉवरच्या तारा पळवल्या

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : टॉवर लाईनच्या कामावरील पहारेकऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटारूंच्या टोळीने रोख रकमेसह ३२ लाख रुपये किमतीच्या तारा लंपास केल्या. ही खळबळजनक घटना मारेगाव तालुक्यातील कानेडा परिसरात मंगळवारी (दि. ८) रात्री घडली. विशेष म्हणजे तार चोरीसाठी ट्रक आणि क्रेनचा वापर करण्यात आला. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

मारेगाव तालुक्यातील कानेडा येथे महाराष्ट्र-तेलंगणा टॉवर लाईनचे साहित्य ठेवण्यात आले आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ९ ते १० जणांचे एक टोळके कानेडा येथून दोन ट्रक घेऊन गेले. हे ट्रक घटनास्थळापासून लांब उभे करण्यात आले होते. अगोदर दोन चोरटे घटनास्थळी गेले. त्या ठिकाणी असलेल्या दोन पहारेकऱ्यांपैकी एकाला चाकू लावला तर दुसऱ्याला पेचकच लावून आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या जवळील दोन हजार रुपये हिसकावून घेतले. पहारेकरी दहशतीत आल्याचे लक्षात येताच, लांब उभ्या असलेल्या सहकाऱ्यांना फोन करून दोन्ही ट्रक घटनास्थळी बोलावून घेतले.

घटनास्थळी उभ्या असलेल्या क्रेन मशीनच्या साह्याने या लुटारूंनी टॉवर तारांचे आठ बंडल ट्रकमध्ये टाकले. ९ वा बंडल क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये टाकत असतानाच क्रेनचा केबल तुटला. त्यामुळे लुटारूंनी पहारेकऱ्यांचे हातपाय बांधून चोरटे घटना स्थळावरून वाहनासह पळून गेले. क्रेन तुटल्याने घटनास्थळी असलेले ११ बंडल तार वाचले. ताराच्या एका बंडलची किंमत चार लाख रुपये आहे. लुटारूंनी ३२ लाखांचे ८ बंडल लंपास केले. पहारेकरी सरीम आलम बाबर अली (रा. कानेडा) यांनी बुधवारी (दि.९) सकाळी आठ वाजता पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलिसांनी अज्ञात ९ ते १० लुटारूंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button