क्रौर्याची परिसीमा! चंद्रपूरमध्ये तरुणाची हत्या, धडावेगळ्या केलेल्या मुंडक्यासोबत खेळला फुटबॉलचा खेळ | पुढारी

क्रौर्याची परिसीमा! चंद्रपूरमध्ये तरुणाची हत्या, धडावेगळ्या केलेल्या मुंडक्यासोबत खेळला फुटबॉलचा खेळ

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूरजवळील दुर्गापूर येथील महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ एका 32 वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या करून मुंडके धडावेगळे करण्यात आले. ही घटना सोमवारी ( दि.7) रात्री अकराच्या सुमारास घडली. महेश मेश्राम (वय 32, रा. आयप्पा मंदिर परिसर, चंद्रपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायरा पेट्रोल पंपाजवळील बियर बारमध्ये महेश मेश्राम आणि अज्ञांत मारेकऱ्यांमध्ये भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने मारेकरी त्या युवकाला लगतच्या पेट्रोल पंप परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याला दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्यानंतर मारेकऱ्यांनी आरी सारख्या धारधार शस्त्राने त्याचे मुंडके धडावेगळा केले. त्यानंतर मारेकऱ्यांनी मुंडक्यासोबत फुटबॉलचा खेळ खेळून मृतदेहासोबत किळसवाणा प्रकार केल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्यानंतर दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

महेश मेश्राम याने काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्या वैमनस्यातून त्या युवकाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दुर्गापूर परिसर गुन्हेगारीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. घटनेनंतर रात्री साडेबाराच्या सुमारास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती घेतली.

ठाणेदार स्वप्नील धुळे या प्रकरणाचा तपास करीत असून या घटनेत एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला चौकशीकरीता रामनगर पोलीस ठाण्यात ठेवले आहे. पेट्रोल पंप व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे या घटनेची शहानिशा करण्यात येणार आहे. या प्रकरणात सहा ते सात आरोपींचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे चंद्रपूर हादरले आहे. या घटनेमुळे तणावाची परिस्थती निर्माण झाली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button