यवतमाळ : अवैध दारुविक्रीला विरोध करणाऱ्या युवकाची हत्या | पुढारी

यवतमाळ : अवैध दारुविक्रीला विरोध करणाऱ्या युवकाची हत्या

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : अवैध दारूविक्रीला विरोध करणाऱ्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना पुसद तालुक्यातील गायमुख नगर येथे गुरुवारी (दि.३) पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अरूण बळीराम राठोड (वय ४५, रा. गायमुख नगर, पुसद) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सहा मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाजी चव्हाण (वय ४०), सचिन चव्हाण (वय १९), राम राठोड (वय २९), राजु चव्हाण (वय ४३), लक्ष्मीबाई चव्हाण (वय ४०) आणि वंदना चव्हाण (वय ३८, सर्व रा. गायमुख नगर, पुसद) या मारेकऱ्यांचा समावेश आहे.

पुसद तालुक्यातील गायमुखनगर येथील अरूण राठोड याच्या शेजारी राहणारे शिवाजी चव्हाण, राजू चव्हाण आणि सचिन चव्हाण हे अवैध गावठी दारूविक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यामुळे वेळी-अवेळी येणाऱ्या मद्यपींचा अरूण राठोड याला त्रास होत होता. आठ दिवसापूर्वी अरूण याने या दारूविक्रीला विरोध केला होता. त्यावरून अरूण याच्यासोबत चव्हाण कुटूंबीयांनी वाद करीत दारूविक्रीला विरोध करायचा नाही, अन्यथा तुला मारल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली होती. दरम्यान गुरुवारी पहाटे याच कारणावरून सहा जणांनी मिळून अरूण याची धारदार शस्त्राने वार करीत निघृण हत्या केली.

वसंतनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आला. या प्रकरणी बळीराम राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून वसंतनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी मारेकऱ्यांची शोधमोहीम राबवून एका तासातच सहाही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी पार पाडली.

हेही वाचलंत का?

Back to top button