बुलढाणा: ड्रायव्हिंग शिकताना कार विहिरीत पडून मायलेकीचा मृत्यू; पती बचावला | पुढारी

बुलढाणा: ड्रायव्हिंग शिकताना कार विहिरीत पडून मायलेकीचा मृत्यू; पती बचावला

बुलढाणा;पुढारी वृत्तसेवा: पत्नीला कार चालववायला शिकवताना पत्नीचे कारवरील नियंत्रण सुटून कार खोल विहीरीत कोसळली. रस्त्याच्या कडेला असलेल्या ६० फूट खोल विहीरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात कारचालक पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात कार चालवणारा पती मात्र बचावला आहे. या अपघात कारचालक पती गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात आज गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, देऊळगाव राजा शहरातील रामनगरात राहणारे शिक्षक अमोल मुरकुटे(३९) हे त्यांची पत्नी स्वाती मुरकुटे(३५)यांना कार चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. यावेळी कारमध्ये त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट(११) ही सुद्धा बसलेली होती. शहरातून चिखली मार्गाकडे कार जात असताना, शिकाऊ वाहनचालक स्वाती मुरकुटे यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याजवळच असलेल्या व पाण्याने भरलेल्या विहीरीत ही कार कोसळली. विहिरीत पाणी असल्याने ही कार पाण्यात बुडाली. कार विहिरीत कोसळताना अमोल मुरकुटे यांनी कारच्या खिडकीतून बाहेर उडी मारल्याने सुदैवाने ते बचावले. मात्र कारचालक त्यांची पत्नी व मुलीचा या अपघातात मृत्यू झाला.

विहीरीतील पाण्यात कार बुडाल्याची बातमी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दोघींच्या शवासह दुर्घटनाग्रस्त कार खोल विहीरीतून पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल व पोलीस पथकाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Back to top button