अमरावतीमध्‍ये इमारत कोसळून ५ ठार, एक गंभीर : ढिगार्‍याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यास ३ ते ४ तासांनी यश | पुढारी

अमरावतीमध्‍ये इमारत कोसळून ५ ठार, एक गंभीर : ढिगार्‍याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यास ३ ते ४ तासांनी यश

अमरावती : पुढारी वृत्तसेवा- अमरावती शहरात व्यापारी प्रतिष्ठानाची इमारत कोसळून पाच जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना जवाहर गेट रोडवरील प्रभात टॉकीजजवळ रविवारी दुपारी घडली. अग्निशमन व पोलिस विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा उचलणे सुरु केले. घटनास्थळी एकच आक्रोश व बघ्यांची गर्दी झाल्यामुळे प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी नागरिकांना लाठ्यांचा धाक दाखविला.

मोहम्मद कमर इक्बाल मोहम्मद रफीक (३५), मोहम्मद आरीफ शेख रहिम (३६, दोन्ही रा. रहमतनगर), रिजवान शाह शरिफ शेख (२०, रा. उस्माननगर, लालखडी), रवी परमार (४२, रा. साईनगर) असे मृताचे नाव आहे. प्राथमिक तपासणीत एका मृताची ओळख पटली नव्हती. राजेंद्र ज्ञानेश्वर कदम (४५, रा. बनकरवाडी, आनंदनगर) असे जखमीचे नाव आहे.

प्रभात टॉकीजजवळ राजेंद्र लॉजच्या इमारतीत राजदीप एम्पोरियम नावाचे व्यापारी प्रतिष्ठान होते. रविवारी दुपारच्या सुमारास राजदिप एम्पोरियममध्ये नुतनीकरणाचे काम सुरु होते. त्यावेळी नुतनीकरणाचे काम करणारे तीन मजूर व दुकानात मॅनेजर रवी परमार यांच्यासह तीन जण उपस्थित होते. दरम्यान दुपारच्या सुमारास अचानक इमारत कोसळल्याने सहा ही जण इमारतीच्या ढीगार्‍याखाली गाडले गेले.

अग्निशमन व पोलिस विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा उचलणे सुरु केले. घटनास्थळी एकच आक्रोश व बघ्यांची गर्दी झाल्यामुळे प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी नागरिकांना लाठ्यांचा धाक दाखविला. त्यानंतर तब्बल दोन तासानंतर पहिल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश मिळाले, त्यानंतर २ ते ३ तासांनी ढीगार्‍याखाली दबलेल्यांना  बाहेर काढण्यास यश मिळाले. या जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत पाच जणांना मृत घोषीत करण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

महापालिकेने इमारत मालकाला बजावल्या होत्या सात नोटीस

राजेंद्र लॉज ही इमारत जुनी असल्याने मोडकळीस आली होती. यासंदर्भात अमरावती महापालिकेकडून इमारत मालकाला आतापर्यंत सात नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परंतू इमारत मालकाने इमारत पूर्ण पाडली नव्हती. या इमारतीचे दोन मजले होते, परंतू वरचा मजला काही दिवसांपूर्वी पाडण्यात आला. खालच्या भागात राजदिप एम्पोरीयम नामक दुकान होते. अखेर रविवारी ती इमारत कोसळून पाच जणांचा बळी गेला.

Back to top button