नागपूर : सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्यास महापालिका आकारणार 200 रुपये दंड | पुढारी

नागपूर : सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्यास महापालिका आकारणार 200 रुपये दंड

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक ठिकाणी मोकाट, भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालतांना आढळून आल्यास किंवा त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास मोकाट, भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर मनपाद्वारे २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता नागपूरकरांनी नागपूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शहर व लगतच्या परिसरातील कुणीही व्यक्ती, रहिवाशी, मोकाट भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी, उद्यान, इत्यादी ठिकाणी अन्न खाऊ घालणार नाही. मोकाट, भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तींनी स्वत:च्या घराच्या व्यतिरीक्त इतर कुठल्याही ठिकाणी अन्न खाऊ घालू नये, जर कोणी व्यक्ती मोकाट, भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालण्यास इच्छुक असेल त्यांनी त्या मोकाट, भटक्या कुत्र्यांना प्रथम दत्तक घ्यावे, त्यांना घरी आणावे, त्यांची महानगरपालिकेमध्ये रीतसर नोंद करुन घ्यावी किंवा त्यांना डॉग शेल्टरमध्ये ठेवावे आणि त्यानंतर त्यांच्यावर प्रेम करावे, यासह त्यांचे लसीकरण व आरोग्यविषयक संपूर्ण काळजी घ्यावी, असे आदेश पारित केले आहेत. मनपाद्वारे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन केले जात आहे.

नागपूर महानगरपालिकेद्वारे या संदर्भात उपाययोजना राबवित उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास व उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करुन सार्वजनिक ठिकाणी मोकाट, भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालतांना आढळून आल्यास किंवा त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास मोकाट, भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर २०० रुपये दंड आकारून वसूल करण्यात येईल, असे नागरिकांना निर्देशित केले आहे.

तसेच मोकाट, भटक्या कुत्र्यांना पकडणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या पथकाला कोणत्याही व्यक्तींनी अडथळा निर्माण केल्यास संबंधीतांविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. तरी शहरातील त्रासदायक मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात तक्रारी असल्यास नागरिकांनी मनपाच्या समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) पाठवावी व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता मनपाचे सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button